मुंबई : एखाद्याने रस्ता, पदपथ व्यापरल्यास त्याच्यावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र पालिकेचा एक उपायुक्त 'टाटा चेंबर्स'चा सदस्य असल्याने ताज हॉटेलने पालिकेचे पदपथ आणि रस्ते व्यापले असले तरी त्यांना 8 कोटी 50 लाख रुपयांची सूट देण्याचा घाट पालिका प्रशासनाकडून घातला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. या अधिकाऱ्याचे नाव आपण स्थायी समितीत घोषित करू असेही रवी राजा म्हणाले.


काय आहे प्रस्ताव :


मुंबईमधील गेट वे ऑफ इंडिया येथे पंचतारांकित ताज हॉटेल आहे. या ताज हॉटेलवर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये दहशदवादी हल्ला झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ताज हॉटेलकडून रस्त्यावर आणि पदपथावर कब्जा करून झाडाच्या कुंड्या लावण्यात आल्या आहेत. हॉटेलमध्ये येणाऱ्यासाठी या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मुंबईत पार्किगसाठी जी रक्कम घेतली जाते त्याप्रमाणे आतापर्यंत ताज हॉटेलने 8 कोटी 50 लाख रुपये इतकी रक्कम पालिकेला भरणे अपेक्षित आहे. मात्र पालिकेने रस्त्यावर पार्किंगसाठी 50 टक्के तर पदपथाचा वापर करण्यासाठी 100 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव फेरविचारासाठी पालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. पालिकेचा एक उपायुक्त 'टाटा चेंबर्स' या संघटनेचा सदस्य आहे. या संस्थेचा सदस्य होण्यासाठी 50 लाख ते 1 कोटी सभासद शुल्क भरावे लागते. लाखो रुपये भरून संबंधित अधिकारी या चेंबर्सचा सदस्य झाला आहे. हा अधिकारी या चेंबर्सचा सदस्य असल्याने पालिका प्रशासनाने ताज हॉटेलला सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ताज हॉटलकडे पैशांची कमतरता नाही. ते पालिकेचे शुल्क भरू शकतात.


आज कोरोनामुळे पालिका प्रशासनाची आर्थिक परिस्थीती खराब झाली आहे. अशावेळी ताज हॉटेल सारख्या मोठ्या हॉटेलला शुल्कात सूट देणे योग्य नसल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. पुढील बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल, तसेच बैठकीत या अधिकाऱ्याचे नाव घोषित करू असेही रवी राजा यांनी सांगितले.


Corona Vaccine | तुम्हाला कोरोनाची लस कशी मिळणार? लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती पाहा!