कल्याण : कल्याण डोंबिवली दरम्यानच्या कचोरे खाडीत पाण्याच्या मधोमध एका खडकावर दोन चीमुरड्यांना सोडून बेपत्ता झालेल्या आईचा 48 तासानंतर देखील शोध सुरु आहे. दरम्यान नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही चीमुरड्याचा जीव वाचला. तर या मुलांच्या वडिलांना शोधण्यात पोलीस यशस्वी झाले असून आईने अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलीस शोध घेत आहेत. सुब्रतो साहू असे या चिमुरड्याच्या वडिलाचे नाव आहे.


सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांना चारही बाजूंनी पाणी असलेल्या एका खडकावर दोन लहान मुले रडत असल्याचे दिसले. त्यांनी या दोन्ही मुलांना गुडघाभर पाण्यातून चालत जात खाडीतून बाहेर काढले. त्यापैकी एक मुलगा दोन वर्षाचा आणि दुसरे अवघे तीन महिन्याचे बाळ असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेत चिमुकल्यांना का व कुणी याठिकाणी सोडले याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मुलाच्या वडिलांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले असून सुब्रतो साहू असे त्यांच नाव आहे.


दरम्यान एक महिला या दोन मुलांना याठिकाणी सोडून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या मुलांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. तपसादरम्यान घटनास्थळी आढळलेल्या मोबाईलच्या आधारे मुलांच्या आई व वडिलांची नावे समोर आली. पोलिसांनी वडिलांना संपर्क साधत त्यांच्याकडे चौकशी केली. दरम्यान लॉकडाऊनमध्ये सुब्रतो यांची नोकरी गेल्याने ते बेरोजगार झाले. लॉकडाऊन आधी या मुलांची आई ब्युटी पार्लर चालवायची, मात्र ते देखील बंद झाले, घरात पैश्यांची चणचण होती. आर्थिक अडचणीतून या महिलेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात असून या महिलेने मुलांना खाडीतील एका खडकावर ठेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे.



संबंधित बातम्या :



दोन चिमुरड्यांना मरणाच्या दारात सोडून आई बेपत्ता