मुंबई : मुंबईतील भाऊ दाजी लाड म्युझिअममधील लिफ्ट अपघातात जखमी झालेल्या डेंटिस्ट डॉ. अर्नवाज हवेवाला यांचं उपचारादरम्यान निधन झालं. दहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 63 वर्षीय हवेवाला गंभीर जखमी झाल्या होत्या.


मुंबईतील प्रसिद्ध दंतचिकित्सक असलेल्या डॉ अर्नवाज हवेवाला एका वर्कशॉपसाठी 28 एप्रिलला भायखळ्यातील राणीच्या बागेत भाऊ दाजी लाड म्युझिअममध्ये गेल्या होत्या. वर्कशॉप झाल्यानंतर खाली वृद्ध आणि दिव्यांगासाठी असलेल्या लिफ्टमधून त्या 24 वर्षीय कन्या हीरासोबत खाली येत होत्या.

'लिफ्टचं दार व्यवस्थित बंद न केल्यामुळे लिफ्ट अडकली. भाऊ दाजी लाड संग्रहालयातील स्टाफ पहिल्या मजल्यावरुन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात लिफ्टला हादरा बसला आणि ती खाली गेली' असा दावा संग्रहालयातील स्टाफने केला आहे.
यावेळी डॉ अर्नवाज आणि त्यांची कन्या हीरा गंभीर जखमी झाल्या होत्या.

अपघातानंतर दोघींना लिफ्टमधून बाहेर काढण्यात आलं आणि डॉ अर्नवाज यांच्या इच्छेनुसार भायखळ्यातील मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मसिना रुग्णालयाच्या माहितीनुसार डॉक्टरांना ओटीपोट आणि टाचेला दुखापत झाली होती.

सुरुवातीला त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र जवळपास 11 दिवसांनंतर उपचारादरम्यान काल (गुरुवारी) सकाळी कार्डिअॅक अरेस्टने त्यांची प्राणज्योत मालवली.