मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच मंत्र्यांच्या बंगल्यावर डागडुजीसाठी कोट्यवधींचा खर्च केला गेला. आता 105 वर्ष जुना पुरातन बंगला पाडून 18 मंत्र्यासाठी 18 मजली टोलेजंग इमारत बांधण्यात येणार आहे. आज झालेल्या सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधीच बंगल्यावर झालेल्या अवाढव्य खर्चामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडब्ल्यूडी आणि मंत्र्यांना सक्त ताकीद दिली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या खर्चाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर कमीत कमी खर्च आणि वास्तूविशारदांनी सांगितलेल्या महागड्या वस्तू न वापरण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यातच आता या नव्या 18 मजली टोलेजंग इमारतीचा मुद्दा समोर आला आहे. या इमारतीच्या खर्चावर अजित पवारांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागून आहे.

या इमारतीसाठी तब्बल 120 कोटी एवढा खर्च करण्यात येणार आहे. एकीकडे सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं वारंवार सांगतिलं जातं पण दुसरीकडे मात्र मंत्र्यांच्या निवासस्थानांवर कोटींचा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आता अधिक आक्रमक होत आहे.

कशी असणार इमारत ?

18 मंत्र्यांसाठी 18 मजली इमारत
प्रत्येक मजला हा 5 हजार स्क्वेअर फुटाचा असणार
प्रत्येक फ्लॅटला 4 बेड रूम, 1 मिटींग रुम, 1 डायनिंग रुम
आणि एक 1 ऑफिसची व्यवस्था
या इमारतीला चारचा एफएसआय देण्यात आला आहे



पुरातन बंगल्याचं वैशिष्ट्य काय आहे?
पुरातन बंगला हा जवळपास 105 वर्ष जुना आहे
मलबार हिलचा रस्ता चढल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहाच्या बाजूला पहिलाच बंगला आहे.
अनेक दिग्गज मंत्र्यांनी या बंगल्यात वास्तव केलं आहे.
त्यामुळे अनेकांचा हा आवडीचा बंगला राहिला आहे.
नुकतंच 2014 ते 2019 पर्यंत शिवसेनेच्या सुभाष देसाईनी हा बंगल्यात वास्तव्य केलं आहे
सह्याद्री आणि वर्षा बंगल्याच्या बाजूला हा बंगला असल्यानं
नेहमीच सर्वांच्या आवडीचा हा बंगला राहिला आहे.

नव्या इमारतींच्या खर्चावर विरोधक आक्रमक
एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसै, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजून ठाकरे सरकारनं दिली नाही. पण दुसरीकडे मात्र बंगल्यांच्या डागडुजीवर आणि नव्या मंत्र्यांच्या निवासस्थानांवर कोटींचा खर्च करण्यात येत आहे अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.