मुंबई : पोलिओच्या लसीत टाईप -2 व्हायरस आढळल्याचं समोर आल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी प्रतिक्रिया दिला आहे. पोलिओ लसीत व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं दीपक सावंत यांनी आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद केल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं.


केंद्र सरकारकडून 10 सप्टेंबरलाच या कंपनीच्या व्हॅक्सिनचा वापर न करण्याबाबतची सूचना मिळाली होती, त्यामुळे 11 सप्टेंबरपासून या लसींचा वापर बंद करण्यात आला होता. महाराष्ट्रात टाईप-2 व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही. संपूर्ण स्टॉक थांबवण्यात आला आहे, अशी माहिती दीपक सांवंत यांनी दिली.


महाराष्ट्र सरकारकडून पोलिओ निर्मूलनासाठी दोन प्रकारे पोलिओची लस देण्यात येते. एक तोंडाद्वारे आणि दुसरी इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाते. हे दोन्ही प्रकार सुरक्षित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने या लसीसंबंधी घाबरण्याचे कारण नाही, असं दीपक सावंत यांनी सांगितलं.


गाझियाबादमधील बायोमेड कंपनीकडून महाराष्ट्राला पोलिओची लस पुरवली जात होती. महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या पोलिओच्या लसीत टाईप -2 व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.