कल्याण : स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते, म्हणून त्यांना विरोध झाला, अन्य जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता, असा मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे. आज कल्याणमध्ये आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोप सोहळ्याला ते बोलत होते. सावरकर आणि त्यांच्या पत्नी यांनी कधीही जातीभेद मानला नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं. शिवाय शिवरायांच्या हातात शस्त्र होतं म्हणूनच ते अफजलखानाचा वध करू शकले, त्यामुळे गांधीजींच्या अहिंसा तत्वापेक्षा सावरकरांची तत्व अधिक श्रेष्ठ होती, असंही मत पोंक्षेंनी व्यक्त केलं. सावरकर यांना वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या माणसाने जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिझवलं, त्याच माणसाला ब्राह्मण या तीन अक्षरामध्ये बंदिस्त करुन टाकलं आहे, असं ते म्हणाले.


यावेळी शरद पोंक्षे म्हणाले की, सावरकर ब्राम्हण होते म्हणून त्यांना विरोध होत आहे. अन्य जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता, यामागे जातीयवादाचं राजकारण आहे. ते पुढे म्हणाले की, मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असं म्हटल्याने दुसऱ्या भाषांचा अपमान होत नाही. 'गर्व से कहो हम हिंदू है', म्हटल्याने दुसऱ्या धर्माचा अपमान होत नाही, असं ते म्हणाले. हिंदू धर्मासारखा दुसरा सेक्युलर धर्म नाही, असंही ते यावेळी म्हणाले. हिंदू असणं म्हणजेचं सेक्युलर असणं आहे, हिंदू असणं हेच माणूस असणं आहे, असंही पोंक्षे यावेळी म्हणाले.

हेही वाचा- शरद पोंक्षेंनी लढाई जिंकली, कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर रंगमंचावर पुनरागमन