Maharashtra Political Crisisशिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणे पुत्रांकडून होणाऱ्या टीकेवर आज भाष्य केलं आहे. माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केसरकरांना उद्देशून ट्वीट केलं होतं. यात उद्धव ठाकरेंबद्दल एवढं प्रेम असेल तर मातोश्रीवर भांडी घासावी असं म्हटलं होतं. यावर केसरकर यांनी बोलताना म्हटलं की, नारायण राणेंच्या मुलानं ट्वीट केलं की उद्धव ठाकरेंबद्दल एवढं प्रेम असेल तर मी मातोश्रीवर भांडी घासावी. हा माझा अपमान आहे. यानंतर मात्र सिंधुदुर्गातल्या एकाही शिवसैनिकाला निषेध करावासा वाटला नाही, असं केसरकर म्हणाले. 


केसरकर म्हणाले की, राणेंची मुलं कशी बोलतात याची काळजी घेण्याची जबाबदारी नारायण राणेंची आहे. नारायण राणेंशी माझा वाद नाही, त्याचे कार्यकर्ते जे वागतात त्यावर आक्षेप आहे. राणे त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहेत. मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी जर राणेंसोबत काम करायचं असेल तर मी प्रत्यक्ष राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी का बोलेन. कारण तेवढा मी सिनिअर आहे. वयाने सिनिअर आहे, जवळ जवळ राणे साहेबांच्या वयाचा आहे. नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. त्या प्रकारे त्यांचे खालचे कार्यकर्ते वागतात, त्या कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे. ज्याक्षणी कार्यपद्धती सुधारेल, माझा काहीच वाद राहणार नाही. नारायण राणे यांच्यातील मॅचुरीटी अनेक वर्ष काम केल्यामुळं आहे. ते खालून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात कुणाशी बोलावं असं माझं मत नाही, असं केसरकरांनी म्हटलं आहे. 


केसरकरांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं ही भूमिका मी सतत मांडत राहिलोय. पण किती दिवस वाट बघायची याला मर्यादा आहे. एकत्र येण्याच्या भूमिकेला रिस्पॉन्स  द्यायचा की नाही हे ठाकरेंनी ठरवायचं आम्ही वाट बघितली आता जनतेच्या कामाला लागलोय.  पुनर्नियुक्त्या आणि पक्षातील इतर बाबींविषयी एकनाथ शिंदेच निर्णय घेतील आणि बोलतील, असंही केसरकर यांनी सांगितलं. 


काय म्हणाले होते निलेश राणे 
निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा.  उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल तर जाऊन मातोश्रीवर त्यांची भांडी घासा.   दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका, असंही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


तुम्ही हिंदुत्वासाठी इथं आला, मग डुप्लिकेट हिंदुत्व दाखवणाऱ्या विरोधात बोलल्यावर तुम्हाला राग का येतो? राणेंचा केसरकरांना सवाल