Anjali Damania on Nilesh Rane : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आपल्या वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचं कारण आहे त्यांनी मालवणच्या मुख्याधिकाऱ्यांशी (Malvan CO) दादागिरी केली आहे.  आता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे. महाराष्ट्राचे टोक दाखवू का तुम्हाला? मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधताना निलेश राणेंनी अशी दादागिरीची भाषा वापरली आहे. दरम्यान राणे यांच्या या कृतीनंतर त्यावर टीका देखील होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania)यांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 


काय आहे प्रकरण?


मालवण शहरातील गटारांच्या साफसफाईच्या मुद्द्यावरून निलेश राणे काही कार्यकर्त्यांसह थेट मालवण नगरपरिषदेवर पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना धमकीवजा इशारा दिलाय. मुख्याधिकारी शिवसेनेचे सीईओ असल्याप्रमाणे वागत आहेत. आता राज्यात भाजपचे सरकार आले आहे. पाच वर्षातील भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागणार. असा इशारा देत मुख्याधिकाऱ्यांची शासनाच्या दक्षता विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा यावेळी निलेश राणे यांनी मुख्याधिकारी यांना दिला. 


सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करा -दमानिया  


दरम्यान निलेश राणे यांच्या या भाषेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी म्हटलं आहे की, कोण आहेत निलेश राणे? ते सरकारी कार्यालयात जाऊन धमक्या कसे देऊ शकतात? हे तिन्ही राणे कंपनी समजते काय स्वतःला? मुख्याधिकाऱ्यांना झापतो हा माणूस?  सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल 186 नुसार एफआयआर दाखल करा, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे. 






निलेश राणेंचा काल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनाही दम


एकीकडे अधिकाऱ्यांवर अशी दादागिरी करणाऱ्या निलेश राणे यांनी काल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनाही दम दिलाय. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून गेले काही दिवस प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या दीपक केसरकरांना भाजपचे नेते निलेश राणे यांनी मर्यादेत राहा असा इशारा दिलाय. राणेंची मुलं लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे, असं केसरकर यांनी म्हटलं होतं. त्यावर निलेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदेंच्या कुबड्या मिळाल्यात त्यावर चाला, असं सांगत राणेंनी केसरकरांच्या टीकेला उत्तर दिलंय.