Dasara Melava : दसरा मेळाव्याला आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai HighCourt) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena Thackeray) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गट शिवाजी पार्क तर शिंदे गट बीकेसी एमएमआरडीए मैदानावर सभा घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळं दोन्ही मैदानं कार्यकर्त्यांनी तुडूंब भरवण्यासाठी दोन्ही गट तयारी करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच ठाकरे आणि शिंदे गट आपली ताकद दाखवताना, शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहेत. 


कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटात एक नवी ऊर्जा
वाजत - गाजत -गुलाल - उधळत या! पण शिस्तीत या! असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसेनेचे परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित केलं आहे.  कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटात एक नवी ऊर्जा, उत्साह संचारला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी जमा होणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान कार्यकर्त्यांनी गच्च भरेल, अशा प्रकारची तयारी आता शिवसेना ठाकरे गटाने केली.
 
जशी तयारी ठाकरे गटाची तशीच तयारी शिंदे गटाची


शिंदे गटाला जरी शिवाजी पार्क मैदान मिळालेले नसले तरी बीकेसी एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. हे मैदान सुद्धा शिवाजी पार्क एवढंच मोठं आणि भव्य आहे. राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते जमतील अशा प्रकारची तयारी शिंदे गटाकडून केली जाते आहे. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर आपली पुढची राजकीय भूमिका, दिशा आणि विचार मांडण्यासाठी शिंदे गट तयार आहे. त्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिंदे गटात सामील झालेला शिवसैनिक या दसरा मेळाव्याला हजर राहणार आहे. 


1966 सालापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळावा आज दोन गटात विभागला गेला आहे. ज्या दसरा मेळाव्याला विचारांचे सोनं लुटलं जायचं त्याच मेळाव्यात मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी दोन्ही गटांनी केली आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरला खऱ्या अर्थाने आवाज कुणाचा? हे पाहायला मिळेल.
 
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि वाटचाल ठरवण्यात महत्त्वपूर्ण असलेला मेळावा.  मात्र यंदाच्या वर्षी या दसरा मेळाव्यात दोन्ही गटांचे प्रमुख आपले विचार तर मांडतीलच. शिवाय याच मेळाव्याच्या निमित्ताने आम्हीच खरीच शिवसेना आणि जमलेले तमाम हिंदू बांधव ,भगिनी ,माता हीच आमची ताकद म्हणून दाखवतील.  


इतर महत्वाच्या बातम्या


Dasara Melava : दसरा मेळाव्याचा संघर्ष आज हायकोर्टात; आज नेमका युक्तिवाद काय झाला? वाचा एका क्लिकवर..


दसरा मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत या, पहिल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया