मुंबई : दहीहंडीमध्ये 14 वर्षांखालील चिमुरड्यांना रोखण्याचा नियम वगळता न्यायालयाने उंचीचे निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या जोशात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा चंग आयोजकांनी बांधला आहे.

उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, म्हणून आयोजक आणि गोविदांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केलं आहे. तसंच आयोजकांनीही मोठ्या संख्येने दहीहंड्यांचं आयोजन करावं, असंही समितीने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

गेल्या वर्षी न्यायालीन प्रक्रिया आणि जीएसटीमुळे मोठ्या संख्येने आयोजकांनी माघार घेतली होती. त्यामुळे मोजक्याच आयोजन स्थळांवर गोविंदांची मोठी गर्दी जमली होती. त्यात आयोजकांनी बक्षिसांच्या रकमेतही कपात केली होती. मात्र यंदा उत्सवावर कोणतंही सावट नाही. तसंच थरांच्या मर्यादेवरील निर्बंध उठवल्याने आयोजक मोठ्या संख्येने पुढे येऊन उत्सव साजरा करतील अशी शक्यता आहे.

गोविंदांच्या दहा लाख रुपयांच्या अपघात विम्यासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रिमियमध्ये 100 रुपयांपासून 75 रुपयांपर्यंत कपात केल्याची माहिती समितीचे सरचिटणीस सुरेंद्र पांचाळ यांनी दिली.

नियम कोणते?

प्रत्येक पथक आणि गोविंदाने उच्च न्यायालय आणि सरकारने आखलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन समितीने केले आहे.

14 वर्षांखालील गोविंदांचा थरांमध्ये समावेश करु ये, अशी ताकीदच समितीने दिली आहे.

हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड, प्रोटेक्टर अशा साधनांचा वापर करण्याचा सल्लाही समितीने दिला आहे.

आयोजकांनीही आयोजनस्थळी जमिनीवर मॅट अंथरणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था अशा सर्व सुविधांची पूर्तता करावी, असेही समितीने सांगितले.