ठाणे : ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरणी आरोपी शूटर इरफान सोनू शेखला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राबोडीत गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी मनसे प्रभाग अध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते जमील शेख यांची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. ठाणे पोलिसांनी यापूर्वीच एका आरोपीला अटक केली होती. मात्र गोळी झाडणाऱ्या इरफान सोनू याला उत्तर प्रदेश एसटीएफ आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने लखनौ इथून अटक केली होती. त्याला सोमवारी (5 एप्रिल) ठाणे गुन्हे शाखेने ठाण्यात आणून न्यायालयात हजर केले असता, त्याला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


जमील शेख याच्या हत्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी 25 नोव्हेंबर 2020 रोजी हत्येच्यावेळी दुचाकी चालवणारा आरोपी शाहिद शेखला अटक केली होती. तो सध्या कारागृहात बंदिस्त आहे. मात्र जमीलच्या हत्येत फरारी आरोपी इरफान सोनू शेख याला उत्तर प्रदेश एसटीएफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने लखनौ इथून 3 एप्रिल रोजी अटक केली. त्यानंतर आरोपी इरफानला विमानाने मुंबईत आणण्यात आले. मग ठाणे गुन्हे शाखेने आरोपी इरफान सोनू शेखला सोमवारी ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 11 दिवसांची म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


चौकशीत स्पष्ट होणार हत्येचे कारण 
3 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश एसटीएफ पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. यूपीमध्ये आरोपी इरफान सोनू शेख याला न्यायालयात ट्रान्झिस्ट रिमांड मंजूर करुन ठाणे गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले. मात्र एसटीएफने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये इरफान सोनू शेख आरोपी असून त्याला ओसामा नावाच्या तरुणाने दोन लाखांची सुपारी दिल्याचे सांगण्यात आले. ही सुपारी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकानी दिल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले होते. मात्र आरोपी इरफान शेखला 11 दिवसांची कोठडी मिळाल्याने पोलीस अधिक चौकशीत जमील हत्या प्रकरणाची सर्व माहितीची उकल करणार आहेत. हत्येसाठी सुपारी कोणी दिली? सुपारी कोठे दिली ठाण्यात की उत्तर प्रदेशात? रक्कम किती? कोणी आणि कोणाला दिली? आदी प्रश्नांची उत्तरे लवकरच ठाणे गुन्हे शाखा मिळवणार आहे. येणाऱ्या काही दिवसातच जमील शेख याच्या हत्येचा धागेदोरे आणि सूत्रधाराची उकल होणार आहे.