Barge P 305 Timeline : मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 65 किलोमीटर दूर (35 सागरी मैल) च्या भागात  ONGC साठी काम करणाऱ्या AFCONS च्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेलं  बार्ज PAPAA 305 म्हणजेच P-305 हे संपूर्णपणे तोक्ते या शक्तिशाली तक्रिवादळाच्या तडाख्यात सापडलं. या बार्जवर 261 जण होती. प्रमण नाईक यांच्या मालकीच्या Durmast enterprise company चं हे बार्ज होतं. 


17 मे रोजी चक्रीवादळाच्या विळख्यात येण्यापूर्वी बार्जचे नांगर खोलण्यात आले. ज्यामुळे ते वादळी वाऱ्यांमध्ये वाहू लागलं. वादळात अतिशय भीतीदायकपणे वाहणारं हे बार्ज जहाज एका रिगवर आदळलं आणि त्यामध्ये छिद्र तयार झालं, ज्यामुळं त्यात पाणी जाण्यास सुरुवात झाली. 


17 मे याच दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत भारतीय नौदलानं बार्जवर अडकलेल्यांच्या मदतीसाठी नौदलाच्या युद्धनौका पाठवल्या. INS कोची , INS कोलकाता , कोस्ट गार्ड आणि ONGC च्या जहाजांच्या मदतीनं बचावकार्याला सुरुवात झाली. पण, या साऱ्यामध्ये समुद्रात उसळणाऱ्या 8-10 मीटर उंच लाटा आणि 100 किमी प्रतीतास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी मात्र अडचणी आणखी वाढवल्या. 


P 305 barge accident : P 305 बार्ज दुर्घटनेला जबाबदार कोण?


सायंकाळी 4-5 वाजण्याच्या सुमारास हे बार्ज समुद्रात बुडू लागलं, ज्यामुळं बार्जवर असणाऱ्या सर्व लोकांना समुद्रात उड्या मारण्यास सांगण्यात आलं. बार्जचे 14 लाईफ राफ्ट पाण्यात उतरवण्यात आले खरे, पण ते सर्वच पंक्चर होते. यादरम्यानच जीव वाचवण्यासाठी म्हणून बार्जच्या कॅप्टन राकेश वल्लभ यांच्यासह सर्वजण पाण्यात उतरले. 
21 मे या दिवशी नेमकं काय घडलं? 


बार्ज पी-305 प्रकरणात यलो गेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जचे चीफ इंजिनियर मुस्तफिजूर रहमान यांच्या जबाबानंतर बार्जचे कॅप्टन राकेश वल्लभ आणि इतरांवर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 304(2),338 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली. ज्यामध्ये हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिलेला असतानाही कॅप्टननं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, सध्या पोलीस यंत्रणा कॅप्टनचा शोध घेत आहेत. 


15 जण अद्यापही बेपत्ता... 


बार्ज P305 च्या या दुर्घटनेमध्ये एकूण 261 लोकं होतें. यामधून 186 लोकांना वाचवण्यात यश आलं. तर, 60 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. अद्यापही 15 जणांचा शोध सुरुच आहे. या शोधमोहिमेसाठी भारतीय नौदलाच्या नेतृत्त्वात वोटर सर्च टीमची मदत घेत शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. बार्जचे बुडालेले अवशेष काढण्यासाठीही अंडरवॉटर टीम पाठवण्यात येणार आहे. 


AFCON, ONGC कडून मदतीचा हात 


दरम्यान, AFCON या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कंपनी करणार असून, कुटुंबाला कर्मचाऱ्यांचा पुढील 10 वर्षांचा पगार दिला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. शिवाय इंश्योरन्स कंपेन्सेशनही कंपनी देणाक आहे. AFCON प्रमाणेच ONGC नंही जखमी कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपये आणि मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 


coast gaurd नं दिला सतर्कतेचा इशारा
भारतीय तटरक्षक दल म्हणजेच कोस्ट गार्डने राज्य सरकार आणि सर्व सागरी पोलीस दलांना बार्ज पी 305 आणि टग बोट वारप्रदा वाहत किनाऱ्यावर येऊ शकते, त्यामुळं किनाऱ्यांवर नजर असू द्या असा इशारा दिला. 


दरम्यान, एबीपी न्यूजचे प्रतिनिधी मृत्यूंजय सिंह AFCONS च्या कार्यालयात पोहोचले असता, काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. एफआयआर दाखल करणाऱ्यात आलेले कॅप्टनच यासाठी दोषी आहेत का, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची निश्चिती केलेली नव्हती का? तिथं वाहनांची ये-जा तर सुरु होती, पण सुरक्षा रक्षकानं दिलेल्या माहितीनुसार कार्यालय तर बंद होतं. प्रतिनिधींनी कंपनीच्या संपर्क कक्षाला गाठण्याचा प्रयत्न केला, पण संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकावर फोन केल्याच त्याचं उत्तर कोणीही देत नाही. इतकंच नव्हे, तर कंपनीनं दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरही फोन लावलं असता त्याचंही उत्तर मिळालं नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी. 


अरबी समुद्रात झालेल्या या अपघातानंतर बार्ज 305 चालवणारी कंपनी अनेक प्रश्नांच्या घोळक्यात आहे. एबीपीचे प्रतिनिधी या कंपनीच्याही कार्यालयात पोहोचलं पण, तिथेही टाळंच. मागील काही काळापासून इथं कोणीच कर्मचारी येत नसल्याची धक्कादायक बाब इथं चौकशीतून समोर आली. 


सदर घटनाक्रम आणि एकंदर काही घटकांचा बेजबाबदारपणा आज अनेकांच्या जीवाववर बेतला आहे. किंबहुना दुर्घटनेतून बचावलेल्यांनीही मृत्यूलाच हुलकावणी दिली आहे. असं असलं तरीही आता प्रश्न एकच, या घटनेसाठी नेमकं दोषी कोण?