मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या P 305 बार्ज दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यत 37 जणांचा मृत्यू झालाय तर 186 जणांना नौदलानं सुरक्षित बाहेर काढलंय. मात्र, तोक्ते चक्रीवादळाचा इशारा मिळूनही हे बार्ज भर समुद्रात का थांबलं? या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न आता उभा राहतोय.
11 मे च्या संध्याकाळीच तोक्ते चक्रीवादळाच्या संकटाचा इशारा हवामान विभागानं दिला. अरबी समुद्रात या चक्रीवादळाचा धोका असल्याचंही स्पष्ट केलं आणि 15 मे पर्यंत समुद्रातल्या बोटींनी किनाऱ्यावर यावं अशी सूचनाही केली. या सूचनेनंतर जवळपास अनेक मच्छीमारी करणाऱ्या बोटी बंदरात परतल्या. मात्र, हवामान विभागाच्या इशाऱ्यांनंतरही P-305 हे बार्ज समुद्रातच होतं आणि बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे पूर्वकल्पना असूनही वेळेत तराफा सुरक्षित ठिकाणी न हलवल्यानं ही भयंकर दुर्घटना घडली.
दुर्घटनेच्या जबाबदारीवरून टोलवाटोलवी
P 305 हा एक निवासी बार्ज होता, म्हणजे तेलक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय या जहाजावर करण्यात आली होती.पण त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, यावरून टोलवाटोलवी होताना दिसते आहे.
जिथे हे जहाज काम करत होतं, तो प्रकल्प ओएनजीसीचा आहे. मात्र ओएनजीसीनं या प्रकल्पाचं कंत्राट AFCONS या कंपनीला दिलं आहे, जी शापूरजी पालनजी ग्रुपमधली कंपनी आहे. AFCONS नं हे जहाज ड्युरामास्ट या कंपनीकडून चार्टर केलेलं होतं, असं जाहीर केलं आहे. सागरी वाहतूक आणि तेलक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मुख्य कंत्राटदार म्हणून प्राथमिक जबाबदारी ओएनजीसीला जबाबदारी नाकारता येणार नाही.
जबाबदारी बार्जची मालकी असणा-या डरमॅस्ट कंपनीची ?
पी 305 च्या संकटात तेव्हा भर पडली जेव्हा हे बार्ज पाण्यात भरकटू लागलं. इतकंच नाही तर या बार्जला काही ठिकाणी छिद्र पडल्याचंही लक्षात आलं. मात्र, बार्जला छिद्र पडूनही बार्ज मालकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली नाही.जेव्हा बार्ज बुडत होतं तेव्हा बार्जची मालकी असणा-या डरमॅस्ट कंपनीच्या मालकांनी वेळेवर योग्य उपाययोजना करुन कामगारांचे जीव वाचवणं अपेक्षित होतं. या बार्जवरचे मुख्य अभियंता रेहमान शेख हे सध्या रुग्णालयात जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.बार्जला एक नव्हे तर अनेक ठिकाणी छिद्रं असूनही योग्य वेळेवर खबरदारी घेतली गेली नाही असं त्यांनी म्हटलय.
जबाबदारी कामगारांना नेमणा-या अॅफकॉन कंपनीची?
P 305 बार्ज डोळ्यांदेखत अवघ्या काही मिनीटात बुडालं.तेव्हा भारतीय नौदल मदतीला धावलं मात्र आमच्या कंपन्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असं परत किना-यावर आलेल्या अनेक कामगारांनी सांगितलंय. या दुर्घटनेसंदर्भात पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी चौकशी समिती नेमली आहेय मात्र, या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता पुढे येत आहे.
साधारणपणे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व काळापासून समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या बोटी समुद्रात जात नाहीत. मात्र, 11 मे रोजी वादळाचा इशारा मिळूनही कामगारांसह बार्ज समुद्रातच थांबलं. जेव्हा पहिली सूचना मिळाली, तेव्हाच बार्ज किना-यावर आणलं असतं तर कदाचित कोणाचेच जीव गेले नसते. पण, बार्जशी संबंधित असलेल्या सर्वच यंत्रणांचा हलगर्जीपणा या दुर्घटनेला जबाबदार ठरलाय.