Cyber Crime : गुजरातहून येणाऱ्या पार्सलच्या प्रतिक्षेत असलेल्या डॉक्टर दाम्पत्यास सायबर गुन्हेगारांनी दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. कुरियर कंपनीतून बोलतोय असे सांगत आरोपीने डॉक्टर दाम्पत्यांची दोन लाखाची आर्थिक फसवणूक केली. तक्रारदार डॉक्टर हे केईएम रुग्णालयात तर त्यांची डॉक्टर पत्नी टाटा रूग्णालयात कार्यरत आहेत. गुजरात येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडीलांनी त्यांना खाद्यपदार्थ कुरीयरद्वारे पाठविले होते. ते पार्सल १५ तारखेला मुंबईत पोहचणे अपेक्षित होते. मात्र तरी ते पार्सल न आल्याने डॉक्टरांनी गुगलवर जाऊन कुरियर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यानंतर त्यांना एका अज्ञात इसमाचा फोन आला व त्याने कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पार्सल १६ तारखेपर्यंत मिळेल. तुम्ही मागवलेले पार्सल आलेले आहे. तुम्हाला ते लवकर पाहिजे असल्यास दोन रुपये पाठवावे लागतील असे त्या भामट्याने सांगितले. पण डॉक्टर कामात व्यस्त असल्याने त्यांनी त्यांच्या डॉक्टर पत्नीचा नंबर त्याला देऊन त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार आरोपीने डॉक्टरांच्या पत्नीला कॉल केला आणि कुरीयर बाबतची माहिती दिली. पार्सल अ‍ॅक्टीवेट करण्यासाठी दोन रुपये पाठवावे लागतील असे त्याने सांगितले. त्यानुसार त्या पैसे पाठविण्यास तयार होताच आरेोपीने त्यांना टेक्ट मेसेज करून युमनीपे डॉट को डॉट इन ही लिंक पाठविली.


ती लिंक ओपन केली असता त्यावर बँकेची माहिती भरण्याबाबतची एक विंडो ओपन झाली. तिथे त्यांनी बँक खात्याची माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या एक बँक खात्यातून दोन टप्प्यात एक लाख काढून घेण्यात आले. त्यामुळे त्यांनी लगेच पतीसोबत बँक गाठून खाते व एटीएम कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर सायंकाळी  दुसऱ्या बँक खात्यातून दोन टप्प्यात एक लाख रूपये वळते झाल्याचा त्यांना मेसेज आला. अशाप्रकारे युमनीपे डॉट को डॉट इन ही लिंकच्या माध्यमातून डॉक्टर दाम्पंत्याची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live