Jumbo Mega Block : मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने आज (रविवारी) दिवा आणि ठाणे या स्थानकांच्या दरम्यान तब्बल 18 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेतला होता. या मेगाब्लॉकमुळे 160 लोकल आणि 18 लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आज ठाणे आणि दिवा स्टेशनच्या दरम्यान धीम्या मार्गिकेवरून एकही लोकल धावली नाही. मात्र इतका मोठा ब्लॉक घेऊन नेमकं काय काम केलं जाते आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर आज कळवा स्टेशनवरून येणाऱ्या धीम्या मार्गिका या नवीन तयार करण्यात आलेल्या मार्गिकांना जोडण्यात आल्या. त्यामुळे सोमवारपासून (20 डिसेंबर) कळवा ते मुंब्रा दरम्यान लोकल गाड्या नवीन मार्गिकेवरून धावतील. तर पुढील 15 दिवस जुन्या मार्गिकेवर काम हाती घेण्यात येईल आणि त्या खाडी किनारी बांधण्यात आलेल्या मार्गिकांना जोडण्यात येतील. 

 

या मेगाब्लॉकनंतर सोमवारपासून लोकलचा मार्ग थोडासा बदलून कळवा आणि मुंब्रा स्थानकात या दरम्यान नवीन मार्गावरून या लोकल चालवल्या जातील. पण हा शेवटचा मेगाब्लॉक नसून येणाऱ्या काळात असे 24 आणि 72 तासांचे दोन ते तीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये ठाणे येथील धिम्या मार्गिका नवीन मालिकांना जोडणे, विटावा येथे जलद मार्गिका नवीन नागरिकांना जोडणे, अशी कामे करण्यात येतील.

 

भविष्यात प्रवाशांना फायदा

 

या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र यामुळे भविष्यात याच प्रवाशांना फायदा होईल. पाचवी सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान पारसिकच्या बोगद्यातून दिवा मार्गे पुढे जातील. तर ठाण्याहून सुटणाऱ्या जलद लोकल पारसिकच्या बोगद्यातून न जाता नवीन बनवलेल्या मार्गांवरून धावू लागतील. एक्सप्रेस आणि लोकलचे मार्ग वेगवेगळे झाल्यामुळे वेळापत्रकात अधिक लोकल सामावत येतील. याचा फायदा ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा अशा ठिकाणी राहणऱ्या प्रवाशांना होईल. सूत्रांच्या माहितीनुसार या नवीन वेळापत्रकात जास्तीत जास्त एसी लोकल असतील.

 

ठाणे ते दिवा या दरम्यान होणारे काम हे कुर्ला ते कल्याण या पाचव्या आणि सहाव्या मालिकेच्या प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचे काम आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यांचे काम हाती घेण्यात येईल. एम आर व्ही सी बांधत असलेल्या पाचवी सहावी मार्गिका खऱ्या अर्थाने त्याच वेळी उपयोगी पडेल ज्यावेळी सीएसएमटी ते कल्याण यादरम्यानचे काम पूर्ण होईल. कुर्ला ते कल्याण या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी जर तेरा वर्षे लागली असतील तर कुर्ला ते सायन आणि सायन ते सीएसएमटी या दोन टप्प्याचे काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल याचा अंदाज आज कोणीच बांधू शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha