मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानची जामीनावर सुटका केल्याचा आदेश जारी केला असली तरी त्याची प्रमाणित प्रत वेळेत तुरुंगात पोहोचलेली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा दस्तावेज नाकारण्यात आला. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाला असला तरी या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेमुळे त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे. आता आर्यन खानची उद्या सुटका होणार असल्याची माहिती आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी दिली आहे. 


मुंबई हायकोर्टाच्या निकालाच्या प्रमाणित प्रतीवर एनडीपीएस कोर्ट सुटकेचे आदेश जारी करते. हायकोर्टाच्या आदेशानुसार कैद्याच्या सुटकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची आणि जमानतीची पूर्तता झाल्यावर हे आदेश जारी केले जातात.


क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान गेल्या 26 दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला होता पण न्यायालयाची प्रत पोहोचली नसल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर आज न्यायालयाने जामीन आदेशाची प्रत जारी केली. त्यामुळे आर्यन खान आज तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा असला तरी त्याची प्रत वेळेत पोहोचला नसल्याने त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे. दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावर सही करण्यासाठी जामीनदार म्हणून जुही चावलाने भूमिका बजावली. 


आर्यन खान आज तुरुंगातून सुटणार असल्याची बातमी पसरताच आर्थर रोड तुरुंगाबाहेर आणि मन्नत या शाहरुखच्या बंगल्याबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.  या दोन्ही ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली होती.


अटी-शर्तीसह जामीन 
जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे असं बजावलं आहे. न्यायालयाच्या अटींनुसार, आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. या व्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 


... अन्यथा जामीन रद्द होणार 
जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान, म्हटलं गेलं की, आर्यन खान उच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय देश सोडू शकत नाही. उच्च न्यायालयानं असंही म्हटलं आहे की, आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक आहे. जर आर्यन खाननं अटी मान्य करुन त्यांचं पालन केलं नाही, तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे.  


अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनार्‍यावरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. न्यायमूर्ती एन. डब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांनाही जामीन मंजूर केला आहे.


संबंधित बातम्या :