मुंबई : तब्बल 25 दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मिळाला आहे. आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि या प्रकरणातील सहआरोपी मुनमुन धमेचा यांच्याकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी एनसीबीकडून अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी आपली बाजू मांडताना तिघांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. 


आर्यन आणि इतरांच्या अटकेच्या वेळी मेमोमध्ये कलम 28 आणि 29 लावलेलं नसले तरी दंडाधिकारी न्यायालयाकडून पहिल्यांदा कोठडी मिळवताना अर्जात ते कलम लावलेलं होतं. तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत कोठडी हा नियम, तर जामीन हा अपवाद असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निवाड्यांतून स्पष्ट केले आहे. एखाद्याकडून प्रत्यक्ष अमली पदार्थ हस्तगत झाले नाही, मात्र त्याला कटातील एक सहभागी म्हणून जबाबदार धरलं जातं, असेही निवाड्यांतून स्पष्ट होत असल्याचंही सिंग यांनी दाखला देताना सांगितलं. आर्यनसह इतरांची अटक बेकायदेशीर आहे हा दावा चुकीचा आहे. कारण, एनसीबीनं आतापर्यंत आरोपींची तीनदा कोठडी मिळवली, पण त्यांनी एकदाही त्याला आव्हान देण्यात आले नाही. त्यामुळे तो आधार आता घेतला जाऊ शकत नाही. 


अरबाज मर्चंट हा आर्यनचा लहानपणापासूनच मित्र आहे. तो आर्यनच्या घरी गेल्यानंतर तिथून दोघे एकत्र क्रूझ टर्मिनलकडे निघाले. ते क्रूझवर एकाच खोलीत राहणार होते. मात्र, त्यांना टर्मिनलवरच पकडण्यात आले. आरोपींकडून रक्त तपासणी झाली नसल्याचा दावा त्यांच्याकडून केला आहे. मात्र, तपासणीची गरजच काय? आर्यन आणि अरबाजने सेवन केलं असं आमचं म्हणणंच नाही. त्यांनी जाणीवपूर्वक अमली पदार्थ बाळगले होते, असा आमचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकताच नसल्याचं एनसीबीनं स्पष्ट केलं. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करू शकतात. त्यामुळे तिन्ही आरोपींचे अर्ज फेटाळण्यात यावे, अशी मागणीही सिंग यांनी केली.  


मुकूल रोहतगींचं आर्यनच्या वतीनं एनसीबीच्या दाव्याला उत्तर
क्रूझवर जवळपास तेराशे लोक होते, आर्यनचा संबंध केवळ अरबाजशी व नंतर अर्चित कुमारशी दाखवण्यात आला आहे. अनेकांचा संबंध हा योगायोग नाही म्हणून तो कट असल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. आर्यनला क्रूझवर निमंत्रित करणारे गाबा आणि मानव आणखी दोघे होते पण त्यांना एनसीबीनं अटक केलेली नाही असा युक्तिवाद आर्यनतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी प्रत्युत्तरात दाखल केला.


आरोपी अरबाज मर्चंट याच्यावतीने जेष्ठ वकील अमित देसाई यांनी बाजू मांडताना एनसीबीच्या कार्यपध्दतीचा पर्दाफाश केला. एनसीबीनं अटकच्यावेळी सुरूवातीला अंमली पदार्थ बाळगणे आणि सेवन एवढ्याच आरोपाखाली अटक केली. परंतु, आतापर्यंत आरोपींना कट करस्थानाच्या आरोपाखाली अटक दाखवण्यात आलेली नाही. हे पंचनाम्यावरून दिसून येते .त्यानंतर एनसीबीने त्यांची कोठडी मिळावी म्हणून कलम 28, 29 ही कट कारस्थानाची कलमं लावली आहेत असा दावा केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तिघाही आरोपींना सर्शत जामीन मंजूर केला.


संबंधित बातम्या :