मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) अंमली पदार्थविरोधी विभागाच्या (NCB) विशेष तपास पथकाने (SIT) क्लीन चिट दिली. एसआयटीने आर्यन खानह सहा जणांना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडलं. परंतु कॉर्डिलिया क्रुज ड्रग्स प्रकरणात तपास यंत्रणाच न्यायालायाची भूमिका घेत आहेत, हा चुकीचा पायंडा पाडला जातोय, असं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. वकील उज्ज्व निकम यांनी म्हटलं आहे. अधिकार्‍यांचा अतिउत्साह तपास यंत्रणांसाठी त्रासदायक ठरु शकतो, क्लीन चिट देण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे, असंही अॅड. निकम म्हणाले.


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एसआयटीच्या तपासात ज्या महत्त्वाच्या मुद्यांवर तपास करण्यात आला, त्यावरुन आर्यन खान दोषी आढळला नाही. त्यानंतर एसआयटीने पुराव्यांअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली. 


यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, "कोणाला क्लीन चिट मिळाली, कोणाविरोधात आरोपपत्र दाखल झाले हे माझ्या मते गौण आहे. एनसीबी संचालकांच्या कालच्या प्रतिक्रियेनंतर हे समोर आलं की काही व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे आर्यन खानला पकडण्यात आलं. या सगळ्या प्रकरणामध्ये एनसीबीच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमने तपास सुरु केला. या एसआयटीने तपास अधिकार्‍याचे काम केलं, पुरावा आहे की नाही? यामध्ये सरकारी वकिलाचं काम केलं आणि एक निकाल देऊन टाकला की तो निर्दोष आहे."


हा अधिकार एनसीबीच्या एसआयटीला अधिकार आहे का? असा प्रश्न विचारत हे सगळं न्यायलयाने ठरवायला हवं, असं उज्ज्वल निकम म्हणाले. "या सगळ्या प्रकरणात घिसाडघाई करण्यात आली. आर्यन खानला अटक करुन चमकोगिरी करण्यात आली. या सगळ्या प्रकरणामध्ये एक वाईट पायंडा पडत आहे. एनसीबीला क्लिन चीट देण्याचा अधिकार आहे का? तो अधिकार न्यायालयाला आहे, एनसीबीच्या एसआयटीला नाही," असं निकम यांनी स्पष्ट केलं.


"सामान्य माणसांच्या मनात यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. तपास अधिकाऱ्यांना सुद्धा कॅमेरासमोर येण्याची खूप हौस लागली आहे. जर तो अधिकारी चुकला असेल तर त्याला शासन होईल. समीर वानखेडे यांच्यावर मला भाष्य करायचं नाही. मी समीर वानखेडेचा वकील नाही. तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यायला हवी नाहीतर तुमचा अतिउत्साह यंत्रणांना त्रासदायक ठरु शकतो हे या प्रकरणामुळे दिसून येते," असं उज्ज्व निकम यांनी सांगितलं.


अटकेची टांगती तलवार एनसीबीने ठेवणे हे चुकीचे आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी खूप काळजीपूर्वक पावले उचलायला हवी. राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची तपास यंत्रणा अशी टक्कर योग्य नाही.


काय आहे प्रकरण?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी आता केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 


संबंधित बातम्या


Cruise Drugs Case : नोकरीवर टांगती तलवार, आर्यन खानला मिळालेल्या क्लीनचिटनंतर समीर वानखेडे यांचं काय होणार?


Aryan Khan Chronology : क्रूझ ड्रग्ज प्रकरण ते क्लीनचिट... अशी आहे आर्यन खान केसची क्रोनोलॉजी


Cruise Ship Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल