Mumbai Cruise Drugs Case : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) तत्कालीन तपास अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अर्थात अंमल पदार्थविरोधी विभागाच्या (NCB) विशेष तपास पथकाने (SIT) आपल्या तपासात आर्यन खानह सहा जणांना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडलं आहे.


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. या तपासाची जबाबादारी एनसीबीचे उपसंचालक जनरल संजय सिंह यांना सोपवण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, या एसआयटीने आपल्या तपासादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष दिलं. ज्यात अटकेच्या वेळी आर्यन खानकडून अंमली पदार्थ जप्त झाला होता का? तो ड्रग्ज सिंडिकेटचा सदस्य होता का? अटकेच्या वेळी त्याला एनडीपीएस कायदा लागू होता की नाही? अटकेच्या वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नियम पाळले गेले होते की नाही? या मुद्द्यांचा समावेश होता.


SIT च्या अहवालात काय म्हटलंय? 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एसआयटीच्या तपासात ज्या महत्त्वाच्या मुद्यांवर तपास करण्यात आला, त्यावरुन आर्यन खान दोषी आढळला नाही. त्यानंतर एसआयटीने पुराव्यांअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली, पण सोबतच तपास अधिकाऱ्यांवर कठोर टिप्पणीही केली. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एसआयटीने दिलेल्या अहवालाचा केंद्र सरकारने सखोल अभ्यास केल्याचे सूत्रांनी सांगितलं.


वानखेडे यांच्याकडून अनेक चुका : SIT च्या अहवालात उल्लेख
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून अनेक तांत्रिक चुका झाल्या असल्याचं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आर्यनसह सहा जणांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करता येईल, असं ठोस आणि पुरेसे पुरावे या प्रकरणात मिळालेले नाहीत. एसआयटीच्या अहवालाची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


समीर वानखेडे यांचं काय होणार?
केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाईचा एक भाग म्हणून त्यांना प्रथम संवेदनशील पदावरुन हटवण्यात येईल, त्यानंतर दक्षता विभाग त्यांना आरोपपत्र देऊन त्यांची चौकशी करेल. या चौकशीदरम्यान समीर वानखेडे यांनी दक्षता विभागाला समाधानकारक उत्तरं दिली नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस केली जाऊ शकते. या कारवाईमध्ये त्यांची पगारवाढ रोखून बडतर्फ करण्याची शिफारस देखील होऊ शकते.


पथकाच्याही अडचणी वाढण्याची शक्यता
या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. हे आरोप महाराष्ट्रातील काही नेत्यांनी आणि इतरांनी केले असून त्यांनी एसआयटीकडे आपले जबाबही नोंदवले आहेत. या आरोपांची चौकशी अजूनही सुरु आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीत तथ्य असल्याचं निदर्शनास आल्यास केंद्र सरकार हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडेही सोपवू शकतं. यामुळे समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या पथकातील अनेक अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


काय आहे प्रकरण?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी आता केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 


संबंधित बातम्या


Aryan Khan Chronology : क्रूझ ड्रग्ज प्रकरण ते क्लीनचिट... अशी आहे आर्यन खान केसची क्रोनोलॉजी


Cruise Ship Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल