मुंबई : महाराष्ट्रातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळाप्रकरणातील मुख्य आरोपी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहिली क्लीन चिट देणारे अॅन्टी करप्शन ब्युरोचे प्रुमख परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होऊ शकतात. परमबीर सिंह यांचं नाव मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत प्राधान्यक्रमावर असून त्यावर फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. परमबीर सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


मुंबईतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी अनुभवी परमबीर सिंह हे संयुक्तिक ठरू शकतात. त्यांचा एकंदर आवाका लक्षात घेता त्यांचाच या जबाबदारीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल, अशी शक्यता आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू आहे. तसेच सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्येही परमबीर सिंग यांचेच नाव प्राधान्यक्रमावर असल्याचे चित्र पाहायला मिळते.


पाहा व्हिडीओ : Mumbai Police Commissioner संजय बर्वे यांना गृहमंत्र्यांकडून समन्स


1988च्या बॅचचे अधिकारी परमबीर सिंह यांनी एसीबीची धुरा सांभाळण्यापूर्वी रजनीश सेठ यांच्या जागी आणि त्यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तपद सांभाळलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होते, तो अद्यापही कारागृहात आहे. याशिवाय त्यांनी अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यामध्ये सध्या परदेशात स्थायिक असलेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचाही समावेश असल्याचे त्यांनी उघड केलं होतं. त्यानंतर बॉलिवडूमध्ये खळबळ उडाली होती. सदर प्रकरणी तिच्या पतीवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.


दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदत शनिवारी, 29 फेब्रुवारीला संपणार असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. संजय बर्वे निवृत्त झाल्यानंतर या पदासाठी दावेदार म्हणून परमबीर सिंह, सदानंद दाते, रश्मी शुक्ला, हेमंत नगराळे, के. व्यंकटेशम यांची नावे आघाडीवर आहेत. संजय बर्वे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. मात्र त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 30 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा तीन महिने मुदत वाढवून देण्यात आली. ही मुदतवाढ 29 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने रिक्त झालेल्या आयुक्तपद कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


संबंधित बातम्या : 


मुंबई शहर राहण्यायोग्य आहे का? सर्वेक्षणात तुमचं मत नोंदवा