मुंबई : सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे. तर कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं भाजपच्या वतीनं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे.


फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालानं ठेवला आहे. कॅगच्या अहवालाची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चाही झाली असल्याची माहिती आहे. सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे, असं सूत्रांकडून कळालं आहे.

कॅग अहवालाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतील मतभेद सभागृहात उघड, नवाब मलिकांनी जयंत पाटलांना टोकले


दरम्यान याबद्दल एबीपी माझाशी बोलताना भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्रजी आणि मी (सुधीर मुनगंटीवार) स्वतः सांगत आहोत की जर यामध्ये तथ्य असेल आणि कुणी घोटाळा केला असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. यामध्ये तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती केली पाहिजे. मात्र सुतावरून स्वर्ग गाठायचा असं होता काम नये. संशय ठेऊ नका, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, कॅगचा संशय


तर शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रभू म्हणाले की, CAG ने ज्या पद्धतीने फडणवीस सरकारवर सिडकोमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवला आहे. असं असल्यास ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने या अहवालात भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी. सरकारने सत्य समोर आणावं, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल, असं प्रभू यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिनीच्या व्यवहारात मोठा घोटाळा केल्याचा आरोप फडणवीस सत्तेत असताना काँग्रेसनं केला होता.  सिडकोच्या जमिनीची किंमत 1, 767 कोटी रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकली असल्याचा दावा देखील  काँग्रेसनं केला होता.