मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत जनतेला आधार दिला होता. किंबहुना या आव्हानात्मक काळात ते स्वत:सुद्धा जबाबदारीनं पुढाकार घेत राज्याला कोरोनामुक्तीच्या दिशेनं नेताना दिसले. यातच आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला, तो म्हणजे कोरोना लसीकरणाचा. देशासह राज्यातही काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणास (Coronavirus Vaccination) सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील या लसीकरणाचा उत्साह सुरुवातीला दिसून आला. पण, आता मात्र राज्यात, कुठंतरी लस घेण्यासाठी येणाऱ्यांचा आकडा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देत राजेश टोपे यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं.


कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज, असल्याचं म्हणत टप्प्याटप्प्यानं पार पडणाऱ्या या प्रक्रियेत योग्य वेळी मी स्वत:सुद्धा लस घेणार असल्याचं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं. राज्यात लसीकरणाचा आकडा कमी झालेला असतानाच मुळात हेच कारण नसून लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपमध्येही काही तांत्रिक अडचणी येत आहेत ही बाब त्यांनी मांडली. या अडचणी दूर होऊन सुधारणा होत असल्याची बाबही त्यांनी मांडली.


लस स्वत:हून जाऊन घेण्यास पूर्णपणे प्रतिसाद मिळेल असं नाही, ही वस्तूस्थिती मांडत कोणी दुसऱ्यानं आधील लस घेतल्यानंतर आपण घेऊ अशीच अनेकांची मानसिकता असल्याचं चित्र त्यांनी सर्वांपुढं ठेवलं. यावर तोडगा म्हणून राजेश टोपे स्वत: पुढाकार घेत एका व्हिडीओच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणात सहभागी होण्याचा संदेश देणार आहेत.


... तर आरोग्यमंत्रीही घेणार लस


नागरिकांमध्ये असणाऱं संभ्रमाचं वातावरण दूर करण्यासाठी आमि केंद्रानं यासंबंधीची नियमावली आखल्यास ठरलेल्या टप्प्याप्रमाणं आपण स्वत:सुद्धा ही घेणार असल्याचं ते म्हणाले. मंत्र्यांनी नैतिकतेनं वागणंही अपेक्षित असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.


लसींबाबत भेदभाव नको


कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसी सुरक्षित असून, त्याबाबतीत कोणताही भेदभाव नको असं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं आहे. सध्याच्या लसी या पूर्णपणे चाचणी केल्यानंतरच वापरात आणल्या जात आहेत असं सांगत त्यावर कोणत्याही प्रकारे भाष्य करणं योग्य नसेल यावर त्यांनी भर दिला. शिवाय येत्या दिवसांमध्ये इतरही काही लसी वापरात येणार आहेत. त्यामुळं लसीकरणाच्या या कार्यक्रमाकडे सकारात्मक दृष्टीकोनानं पाहत त्याला चांगला प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी नागरिकांना दिलं.


महाराष्ट्रात लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या दिवशी फक्त 54.34 टक्के प्रतिसाद


देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. परंतु कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील लसीकरण मोहिम 17 आणि 18 जानेवारी या दोन दिवशी स्थगित केली होती.


19 जानेवारीला पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु लसीकरणा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. राज्यात लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी फक्त 54.34 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सगळ्यात जास्त लसीकरण पालघरमध्ये झालं. 400 पैकी 319 जणांनी लस घेतली, म्हणजेच 80 टक्के लसीकरण झालं. तर बीडमध्ये फक्त 28 टक्के लसीकरण झालं. एक दिवसाला 500 जणांना लस घेणं अपेक्षित होतं, परंतु फक्त 142 जणांनीच काल लस घेतली. सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या मुंबईत फक्त 43 टक्के लसीकरण झालं. 1400 पैकी फक्त 595 लोकांनी लस घेतली. तर मुंबई उपनगरात 53 टक्के लसीकरण झाले. इथे 1900 पैकी 1002 जणांनी लस घेतली.