मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यादरम्यान पोहरादेवी इथल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोविडविषयक आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोविड काळात नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितावर प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी इथे पोहोचले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीत कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, "कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी." "तसंच वाशीम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबतचा अहवाल देण्यास सांगा," अशी सूचना त्यांनी मुख्य सचिवांना केली आहे.

Sanjay Rathod | संजय राठोड यांच्या समर्थकांच्या गर्दीमुळे कोरोना वाढल्यास जबाबदार कोण?

Exclusive | संजय राठोड यांना चौकशीला सामोरं जाण्याच्या पोहरादेवी पीठाच्या सूचना, जितेंद्र महाराज यांची माहिती

मुख्यमंत्र्यांनी आज वर्ष बंगल्यावर राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतली. तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, "गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करत होती आणि आता देखील मिशन बीगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे."

Pooja Chavan Death Case | मंत्री शिवसेनेचा, पाठीशी राष्ट्रवादी; अजित पवार आणि नवाब मलिकांकडून संजय राठोड यांची पाठराखण

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे, यासाठीच मी परवा माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितलं होतं. सरकार म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं."