वाशिम : वनमंत्री संजय राठोड यांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं अशी सूचना पोहरादेवी पीठाने दिली आहे. पोहरादेवी गडाचे महंत जितेंद्र महाराज यांनी एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. संजय राठोड थोड्याच वेळात पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. त्यामुळे आज संजय राठोड पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर नेमकं काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सत्य काय आहे याबाबत आम्ही संभ्रमात होतो. मात्र राज्यात जेव्हा जेव्हा बहूजन समाजाचा एखादा नेता मोठा होत असतो तेव्हा त्याला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, कट केले जातात. संजय राठोड यांना देखील संपवण्याचा कट होता. पूजा चव्हाण मृत्यूबाबत आम्ही सर्व महंतांनी शोक व्यक्त केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून सत्य समोर येईल. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. चौकशीअंती जो निकाल येईल तो आम्हाला मान्य असेल, असं पोहरादेवी येथील सुनील महाराज यांनी सांगितलं.


वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल, थोड्याच वेळात पोहरादेवीसाठी रवाना होणार


चौकशी योग्य दिशेने सुरु


पूजा चव्हाण प्रकरणात चौकशीतून काही समोर येत नाही तोपर्यंत कुणाला दोषी ठरवणे हे योग्य नाही किंवा कायद्याला धरुन नाही. चौकशी झाल्यानंतर दोषी कोण आहे हे समोर येईल. चौकशी योग्य दिशेने सुरु आहे. सर्व महंतांची बैठक झाली त्यावेळी, सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याच्या सूचना पोहरादेवी पीठाने दिल्या आहेत, असं जितेंद्र महाराज यांनी सांगितलं. संजय राठोड समाजाचे संयमी नेतृत्व आहे. अशा नाजूक प्रकरणात एकदम समोर येऊन काही बोलणे उचित नसते. संजय राठोड यांनाही वरिष्ठांनी थेट समोर येऊन बोलण्यास मनाई केली असावी, असं जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.


संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल


गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.


संबंधित बातम्या