Dahi Handi Festival 2022: मुंबईतील शिवशंभो गोविंदा पथकातील संदेश दळवी या 22 वर्षीय गोविंदाच्या मृत्यूनंतर कोर्टाच्या नियमांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षितेसाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्रास उल्लंघन झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गोविंदाच्या सुरक्षेबाबत आयोजकांची जबाबदारी कोर्टाने निश्चित केली होती. मात्र, मुंबई-ठाण्यात अनेक दहिंहंडी आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप दहिहंडीबाबत कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या स्वाती पाटील यांनी केला आहे. स्वाती पाटील यांनी गोविंदा पथक आणि दहिहंडी आयोजकांविरोधात पोलीस तक्रारही केली आहे. 


गेली दोन वर्ष कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे अनेक सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाचा जोर ओसरल्याने यंदा निर्बंधमुक्त दहिहंडी साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आगामी महापालिका निवडणुका आणि राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर यंदा दहिहंडीच्या आयोजनात राजकीय पक्षांचा, नेत्यांचा मोठा सहभाग दिसून आला. मात्र, त्याच वेळेस कोर्टाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. 


दहिहंडीच्या उंचीबाबत न्यायलयीन लढाई लढणाऱ्या स्वाती पाटील यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. कोर्टाने 20 फूटांची उंची निर्धारीत करून दिली आहे. मात्र, अनेक दहिहंड्या या अधिक उंचीच्या असल्याचे दिसून आले. पोलिसांकडूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. दहिहंडीबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दादर, वरळी, चेंबूर आणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. कोर्टाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे, नियमांचे उल्लंघन झाले आहे. ज्या ठिकाणी दहिहंडीचे आयोजन करण्यात येत आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी व्हिडिओ रेकोर्डिंग करणे आवश्यक होते. मात्र, तसे आढळून आले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. कोर्टाच्या नियमांप्रमाणे दहिहंडीचा उत्सव हा रस्त्यावर न करता, मोकळ्या मैदानात करावा. मैदानात माती, मॅट, गादी असावेत असेही नियम आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. इतकंच नव्हे तर 14 वर्षाखाली मुलांचा समावेश गोविंदा पथकात नसावा. मात्र, 14 वर्षाखालील मुलांचा सहभाग दिसून आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मतांसाठी तरुणांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला. 


जखमी गोविंदाची संख्या अधिक?


यंदाच्या दहिहंडी उत्सवात मुंबईसह ठाण्यात एकूण 222 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 197 गोविंदांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 25 जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याची माहिती शनिवारी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात जखमी गोविंदांची संख्या अधिक असल्याची भीती स्वाती पाटील यांनी व्यक्त केली आहे. अनेक गोविंदानी खासगी रुग्णालयात उपचार घेतले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. खासगी रुग्णालयातील जखमी गोविंदांची माहिती समोर येत नाही. खासगी रुग्णालयातील गोविंदांना सरकारी मदत मिळण्यासही अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.


गोविंदा पथकांविरोधात तक्रार


कोर्टाने दहिहंडीसाठी 20 फूटांची उंची आखून दिली असताना अनेक ठिकाणी मोठे थर रचण्यात आले. काही गोविंदा पथकांनी आठ-नऊ थर लावले होते. जय जवान आणि कोकणचा राजा या गोविंद पथकांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती स्वाती पाटील यांनी दिली.



>> दहिहंडीबाबत कोर्टाचे नियम काय?


> गोविंदाच्या सुरक्षेबाबत उपाययोजना आखण्यात याव्यात. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आदी उपाययोजनांची व्यवस्था आयोजकांनी करायची आहे.


> प्रत्येक गोविंदा पथकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गोविंदा पथकांची माहिती द्यावी. यामध्ये गोविंदा पथकातील सदस्यांची नावे, वय व पत्ता असावा. त्याशिवाय बाल गोविंदा असल्यास त्याचे वय आणि वयाचे प्रमाणपत्रही दाखल करावे


> गोविंदा पथकात 14 वर्षांखालील मुलांचा समावेश असू नये 


> दहिहंडी आयोजनात नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची देखरेख ठेवण्यासाठी वॉर्ड निहाय पाचजणांची समिती असावी. 


> दहिहंडीची उंची 20 फूटांपेक्षा अधिक असू नये. 


> रस्त्यावर दहिहंडीचे आयोजन करू नये. मोकळ्या मैदानात दहिहंडीचे आयोजन व्हावे. दहिहंडी होणाऱ्या मैदानात माती, गादी मॅटची व्यवस्था करावी.


> दहिहंडीचे आयोजन होत असलेल्या ठिकाणी मोबाइल रुग्णवाहिका असावी 


> दहिहंडी आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी पोलिसांनी व्हिडिओ रेकोर्डिंग करावी. जेणेकरून आयोजक आणि गोविंदा पथकाकडून नियमांचे पालन होत आहे की नाही याबाबत पुरावे पोलिसांकडे असतील.