मुंबई : पुण्यातील भोसरी, एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढ झालीय. गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना 19 जुलैपर्यंत ईडीच्याच ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिलेत.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी मधला सव्र्हे क्र. 52/2 (अ) ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी या मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंदही केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि उकानींच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबिय सरकारनोंदी कागदोपत्री मालक झाले आहेत. मात्र, या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
या प्रकरणात अखेर खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मागील मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आणि त्याच रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने 15 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. गुरुवारी कोठडी संपत असल्यानं गिरीश चौधरी यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा, सदर प्रकरणातील व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध आहे. त्यासंदर्भात पुढील तपास आणि पुरावे गोळा करण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या चौकशीसाठी चौधरी यांच्या कोठडीत वाढ देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने चौधरी यांच्या ईडी कोठडी 19 जुलैपर्यंत वाढ केली.