मुंबई : देशात सध्या कोरोना विषाणूचं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात ठाकरे सरकारने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरलेले आहेत, असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चाललेली आहे. सामना पेपर चालवणं हे सोपं काम आहे. मात्र, कोरोनाचा सामना करणे हे सोपे काम नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कोरोना वर उपाय योजना करण्यात सरकार कमी पडलेलं आहे.


आज जर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतं तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर उतरले असते. सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत. अशाने या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणणार. ठाकरे सरकारला कोरोना वर मात करायला अपयश आले असल्याची टीका आठवले यांनी केली.


राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राहात असून, त्याच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यात अनेक निर्णय हे राष्ट्रवादीला घेता येत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल आहे. राज्यात जरी तीन पक्षांचे सरकार असले तरी ही सेना इतर पक्षांचे ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि देशाच्या भल्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला हवा. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्या साठी शरद पवार यांनी शिवसेने सोबत राहू नये, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.


लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार


मागील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जर राज्यात वेगळी लढली असती तर ती सत्तेवर आली असती. भाजपला कमीत कमी 140 जागा मिळाल्या असत्या. त्यावेळी जर आम्हाला जागा कमी पडल्या असत्या तर आम्ही शरद पवार यांनाच विनंती केली असती आणि त्यांना सत्तेत सामील करून घेतलं असतं.


राष्ट्रवादी काँग्रेसने देशाचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शरद पवार हे नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांना नेहमीच पाठिंबा देत आहेत. शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीचा काहीच फायदा नाही. शरद पवार साहेब हे एनडीए (NDA) सोबतच हवे होते. शरद पवार जर केंद्रीय मंत्रिमंडळात आले तर त्यांचा अनुभव देशासाठी चांगला असणार आहे. देशाच्या फायद्यासाठी, महाराष्ट्राच्या फायद्यासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत आलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. असं रामदास आठवले यांनी सांगितले आहे.


Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला