मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांचं कौतुक केलं. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त 166 आहे.


धारावीतील कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देताना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला. जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, असं त्यांनी म्हटलंय.


मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या कामाचं कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखली केलं. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगताना त्यांनी धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.


कौतुकास्पद... खार पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांचं प्लाज्मा डोनेशन


धारावीचा कोरोनामुक्तीकडचा प्रवास


धारावीचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. स्थानिक धारावीकर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वंयसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पहावे लागेल. कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे, स्वच्छतेचे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते. हेच धारावीमध्ये दिसून आले आहे.


साडेतीव लाख लोकांचे स्क्रिनिंग
या मोहिमेत 47 हजार 500 घरं डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली. 3.6 लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो ॲक्टीव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि कॉरंटाईन सेंटर्स यामुळे साथ नियंत्रणात ठेवता आली.


Coronavirus in Mumbai | मुंबईत महिन्याभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 टक्क्यांनी घसरला