मुंबई : देशात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होत आहे. सध्या सर्वांच्या गरजेची असणारी औषधे आणि सर्जिकल संबंधित असणाऱ्या गोष्टी मुंबईत कमी प्रमाणात येत असल्यामुळे आणखी आठ दिवसांनी त्यांचाही तुटवडा जाणवणार आहे.


लॉकडाऊन झाल्यापासून संपूर्ण राज्यामध्ये औषध, हॅण्ड ग्लोव्ज, पीपी किट यांची मागणी वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये होलसेल विक्रेत्यांकडे जेवढा साठा उपलब्ध होता तो कमी वेळेतच विकला गेलेला आहे. आता नवीन वस्तू पुन्हा मुंबईत मागवायचा झाल्या, तर त्या विविध राज्यांमधून मागवाव्यात लागत आहेत. मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनी हा माल वितरकांकडे पोहोचवण्यासाठी तयार होत नाहीत.


आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टीचा पुरवठा सुरळीत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. भाजीपाला, दूध, धान्य यांचे वितरण सुरु आहे. तसेच औषधांचे वितरण हे सुरु आहे. मात्र राज्या बाहेर असणाऱ्या विविध फॅक्टरीमध्ये तयार असलेला माल मुंबईत आणण्यासाठी कोणीही तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरातील काही महत्त्वाच्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना परवानगी देऊन राज्यभरातील फॅक्टरीमध्ये तयार असलेली औषध, हॅण्ड ग्लोज तसेच सर्जिकल संदर्भात असणाऱ्या वस्तू यांचा पुरवठा करुन द्यावा अशी मागणी होत आहे.


मेडिकलशी संबंधित होलसेल व्यापाऱ्यांकडे कंपनीत माल येणं कमी झालं आहे. भविष्यात राज्यात औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. कारण कंपनीपासून होलसेल दुकानापर्यंत माल आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नाही. सध्या केवळ मास्क किंवा मेडिकल संदर्भातलं इतर साहित्य मागवायचं असेल, तर पूर्ण ट्रकचं भाडं भरावे लागत आहे. वस्तू केवळ 10,000 असल्या तर त्याचं भाडं वीस ते पंचवीस हजार रुपये होत आहे. त्यामुळे हे भाडं परवडण्यासारखं नाही. माल पोहोचवण्यास संदर्भात आणि भाड्या संदर्भात ट्रान्सपोर्ट कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे.


सध्या मुंबईतील वितरकांकडे वस्तू संपत चाललेले आहेत. त्यामुळे यांचा पुरवठा पूर्ववत केला नाही, तर येत्या आठ दिवसात महाराष्ट्रात पुन्हा नवीन संकट निर्माण होईल होण्याची शक्यता निर्माण झालली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही ट्रान्सपोर्ट सुविधा त्वरित सुरु करणं अत्यावश्यक आहे.


प्रतिक्रिया


जिग्नेश दवे (वितरक)
औषध, हॅण्ड ग्लोव्ज आणि विविध वस्तूंची मागणी सध्या वाढलेली आहे. या वस्तू वितरकांकडे देखील आता कमी होत आहेत. त्यामुळे राज्यासह राज्याबाहेर असणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये तयार असलेला माल आता वितरकांकडे पोहोचवणे गरजेचे आहे. मात्र यासाठी ट्रान्सपोर्ट कंपन्या तयार होत नाहीत आणि ज्या कंपन्या तयार होतात त्या मात्र अव्वाच्या सव्वा भाव लावत आहेत. त्यामुळे वितरकांना हे ही परवडत नाही. सरकारने या गोष्टीकडे गंभीर्याने पाहणं गरजेचं आहे. जर देशातील काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना परवानगी दिली नाही तर येत्या आठ दिवसांमध्ये विविध राज्यांमध्ये पुन्हा औषधांसह इतर वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.


भारत जाधव ( ट्रान्सपोर्ट व्यवसाय)
लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट कंपन्यांवर मोठा परिणाम झालाय हे खरं आहे. काही कंपन्यांच्या गाड्या या सरकारकडून वापरल्या जात असून त्यामध्ये भाजीपाला, धान्याची वाहतूक होते. मात्र इतर गोष्टींसाठी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना गाड्या बाहेर काढणं अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत कोणी ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक धोका पत्करायला तयार नाहीत. त्यामुळे शासनाने जर फर्मान काढलं तरच ट्रान्सपोर्ट कंपन्या आपली वाहनं रस्त्यावर उतरतील.