कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवली या भागामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. एका बाजूला रुग्णांची वाढणारी संख्या, दुसऱ्या बाजूला महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्यामुळे या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तसंच महापालिकेचे कोविड सेंटर हे कल्याण शहरापासून आठ किलोमीटर, भिवंडी बायपास हायवेजवळ असल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. कोरोनाची वाढती रुग्ण संख्याही महापालिका प्रशासनाची डोकेदुखी बनलेली आहे.


मुंबई शेजारीच असणार्‍या कल्याण-डोंबिवलीमध्ये सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव दिसत आहे. दररोज तीनशे ते साडेपाचशे नवीन रुग्ण संख्येत भर पडत आहे. मुंबईपाठोपाठ सर्वात जास्त रुग्ण संख्या सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात वाढताना दिसत आहे. मात्र महापालिका प्रशासन ही रुग्ण संख्या रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात होत असताना लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामध्ये कोरोनाचं संक्रमण कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये या लॉकडाऊनला कोणी गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही. तर स्थानिक महापालिका प्रशासन यावर उपायोजना करण्यात कमी पडू लागलं. त्यामुळे नागरिक वेगवेगळ्या कारणासाठी बिनधास्तपणे सर्वत्र वावरु लागले होते. एका बाजूला अनलॉक वनची सुरुवात झालेली, असताना कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावली आहे.


कोरोनाची लागण होत असताना राज्यातील वेगवेगळ्या महापालिकांनी आपल्या शहरातील प्रशासकीय रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर उभारुन तिथे रुग्णांवर उपचार सुरु केले. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे स्वतःचं सुसज्ज असे एकही रुग्णालय नसल्यामुळे महापालिका या परिसरात असणाऱ्या खासगी रुग्णालयांवर पूर्णपणे अवलंबून आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील 17 खाजगी रुग्णालयांसोबत महापालिकेने टायअप करुन या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मात्र या रुग्णालयांमार्फत रुग्णांना महाग सेवा मिळत असल्याच्या तक्रारी सुद्धा पुढे येत आहेत. महापालिकेने कल्याणपासून आठ किलोमीटर तर डोंबिवलीपासून 16 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भिवंडी बायपास इथल्या इमारतींमध्ये कोविड सेंटर सुरु केलं आहे. हे सेंटर शहराच्या बाहेर असल्यामुळे इथे रुग्णांचे हाल होत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये BSUP (बेसिक सर्विस ऑफ अर्बन पुअर) या केंद्राच्या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली साडेसात हजार रिकामी घरे उपलब्ध असताना, कोरोना रुग्णांवर शहराच्या बाहेर उपचार केले जात आहेत. जर प्रशासनाने या सात हजार घरांमध्ये कोविड सेंटर उभे केले असते तर शासनाचा वेळ आणि पैसा वाचला असताच, त्याचबरोबर रुग्णांचे हालही झाले नसते.


दररोज वाढणारी रुग्ण संख्या ही महापालिकेची डोकेदुखी बनत चाललेली आहे. एका बाजूला रुग्ण संख्या वाढते तर दुसऱ्या बाजूला महापालिका अधिकारी-कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण होत आहे. महापालिकेचा कारभार हा बहुतांश प्रभारी अधिकाऱ्यांवर चालू आहे. त्यामुळे सक्षम निर्णय घेण्यास वेळ लागत आहे. महापालिकेने कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयाच्या दावणीला बांधलेलं आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक लूट तर होत आहेच, तर दुसरीकडे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देखील अनेक जण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबवण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. राजकीय इच्छा शक्तीचा अभाव, महापालिकेचे वेळकाढू धोरण, सक्षम निर्णय घेता येत नसल्याने कल्याण-डोंबिवली इथे कोरोनावरील उपाययोजना सपशेल फसलेल्या आहेत. आता राज्य सरकारनेच कल्याण-डोंबिवलीमध्ये लक्ष घालून नागरिकांना कोरोनापासून वाचवावं असे म्हणण्याची वेळ या परिसरातील नागरिकांवर आलेली आहे.


प्रतिक्रिया


श्रीनिवास घाणेकर (कल्याण)
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संक्रमण होत असताना त्यावर इतर जिल्ह्यातील प्रशासनाने ज्या पद्धतीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तशा उपाययोजना करण्यास कल्याण डोंबिवली महापालिका कमी पडल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे आयुक्त, प्रभारी अधिकारी, महापौर, विरोधी पक्षनेते यांना काही सांगायचं म्हटलं तर त्यांचे सदैव कानावर हात असतात. सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आव आणत असले तरी कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या हे त्यांचे पितळ उघडे पाडत आहेत. शहराच्या बाहेर हायवेलगत उभारलेलं कोविड सेंटर, रुग्णांची होणारी फरफट, खाजगी रुग्णालयांकडून होणारी पिळवणूक या संपूर्ण गोष्टींकडे महापालिका प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. जर त्यांनी यापूर्वीच खबरदारी घेतली असती तर कल्याण-डोंबिवली परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढलीच नसती. आतातरी प्रशासनाने या सर्व गोष्टी पत्करुन कामाला लागणे आवश्यक आहे.


कौस्तुब गोखले (डोंबिवली)
कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याची वेळ येणे म्हणजे महापालिका प्रशासन सपशेल फोल ठरणे असाच त्याचा अर्थ होतो. महापालिकेचा कारभार बहुतांश प्रभारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. पूर्णवेळ आणि सक्षम अधिकाऱ्यांचा अभाव, महापौर आणि विरोधी पक्षनेते हे सगळे सारखेच असून कोणी कोणावर बोट दाखवायला तयार नाही. रुग्णांच्या बाबतीत तर 'राम भरोसे ' अशीच परिस्थिती आहे. ज्या रुग्णांच्या ओळखीचा एखादा सक्षम नेता असेल, तर त्याच्यावर खासगी रुग्णालयात चांगले उपचार होतात. इतर रुग्णांना मात्र आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. रुग्णांची होणारी फरफट बघून आम्ही कित्येक वेळा आयुक्त, उपायुक्त यांना या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. आता तर महापालिका अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर-नर्सेस यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी काय बघावे लागेल याचा विचार न केलेलाच बरा.