अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनीवर बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल, असे आदेश पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आतापर्यंत 77,197 कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर महाराष्ट्रात 1 लाख 74 हजार 761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात महाराष्ट्र कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेलं राज्य आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. यानुसार मागच्याच आठवड्यात राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत राज्यात आधीचेच आहे तेच नियम लागू असणार आहेत. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. एकप्रकारे राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवले असे म्हणायला हरकत नाही.
मुंबईसह काही ठिकाणी लॉकडाऊनच!
मुंबईसह ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसंच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील 2 जुलै 12 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात देखील 1 जुलै ते 12 जुलै संपूर्ण लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात संध्याकाळी 7 ते सकाळी 7 संचारबंदी आहे. नागरिकांना बाहेर निघण्यास मनाई केली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा 2 जुलै ते 8 जुलै अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्हा देखील1 जुलै ते 8 जुलै संपूर्ण लॉकडाऊन केला आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 46 कन्टेन्मेंट झोन्समधे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे.