मुंबई : पाकिस्तानमधून ताज हॉटेल उडवण्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील 191 ठिकाणी नाकाबंदी वाढवली आहे. याशिवाय मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी ठिकाणांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.


मुंबई पोलिसांनी इंटरपोल आणि आयबीआयच्या मदतीने पाकिस्तानकडून या कॉल आणि कॉलरची संपूर्ण माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आपण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असल्याचं फोनवरुन धमकी देणाऱ्याने सांगितलं होतं. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा कॉल पाकिस्तानमधून केला असून त्याची ओळखही पटली आहे. देशाच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने या कॉलरबद्दल मिळालेल्या माहितीच व्हेरिफिकेशन करण्याचं काम सुरु आहे.


मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला? पाकिस्तानमधून फोन, ताज हॉटेल उडवण्याची धमकी


'हॅलो ... पुन्हा ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला होईल...' या शब्दांत पाकिस्तानमधून आलेल्या कॉलमुळे मुंबईत हाय अलर्ट घोषित केला आहे. मुंबईतील ताज हॉटेलच्या धमकीनंतर मुंबई शहरात हाय अलर्ट आहे. मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.


या व्यतिरिक्त या धमकीनंतर मुंबईच्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लावलेली नाकाबंदी ही वाढली आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुंबईत एकूण 191 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच, सागरी किनारपट्टीवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


पाकिस्तानातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास, दुपारी 12.30 वाजता ताज मंगल पॅलेस आणि मुंबईतील ताज लॅण्ड्स एंड हॉटेलला कॉल आला होता. या नंबरचा कोड +92 म्हणजे पाकिस्तानचा होता. पहिला कॉल हॉटेल ताज लॅण्ड्स एंडला केला होत, जो 37 सेकंदांपर्यंत सुरु होता. दुसरा कॉल हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये आला जो 45 सेकंद चालला. ज्या व्यक्तीने दोन्ही वेळा कॉल केला त्याने स्वत:ला लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असल्याचं सांगितलं. "ताज हॉटेलमध्ये 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होईल," अशी धमकी त्याने दिली. कॉल करणारा व्यक्तीने हिंदी भाषेत बोलत होता.


महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली की, "कराची स्टॉक एक्स्चेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये मिळालेल्या धमकीनंतर एकूणच सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी, मी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आणि सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत."


खरंतर हा धोका गांभीर्याने घेतला जात आहे, त्याचं कारण हा कॉल थेट पाकिस्तानमधून आला होता. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणि सीमेवर पाकिस्तानबरोबर वाढलेला तणाव या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही धमकी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार गांभीर्याने घेत आहेत. मुंबई कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असतं. गेल्या सात वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या कराची येथून येणाऱ्या कॉलविषयी माहिती मिळाली आहे. परंतु हा कॉल संगणकावरुन आला आहे की फोनद्वारे केला, त्याचा शोध घेण्यात येत आहे. इंटरपोल, आयबीच्या मदतीने मुंबई पोलीस या कॉलरची खरी ओळख पटवण्याचं काम करत आहेत.


मुंबई पोलिसांनी याविषयी सगळी माहिती केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा यांना कळवली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.


Taj Hotel | पाकिस्तानमधून फोन, ताज हॉटेल उडवण्याची धमकी; मुंबई पोलिंसांकडून हॉटेलच्या सुरक्षेत वाढ