भिवंडी : भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 29 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात 16 नवे रुग्ण आढळले आहेत. तर शहरी भागात 35 रुग्ण आढळले आहेत. या 45 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 253 वर पोहचला आहे.
भिवंडी शहरात आज 29 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये 7 पुरुष, 6 महिला आणि 10 मुले हे 23 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आल्याने त्यांनी कोरोनाची लागण झाली. तर उर्वरित पाच रुग्णांमध्ये दोन डॉक्टर असून आणखी एक पुरुष आणि दोन महिला असे तीन रुग्ण मुंबईवरून आलेले आहेत. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील 14 जण तर दुसऱ्या कुटुंबातील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या 29 नव्या रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 147 वर पोहोचला आहे. तर 7 रुग्णांचा मृत्यू झालेला असून 63 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 77 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
तर ग्रामीण भागात देखील आज 16 नवे रुग्ण आढळले आहेत. या 16 नव्या रुग्णांपैकी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 4, दिवा अंजुर 4 , कोनगाव 4, दाभाड 3 रुग्ण तर वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एक नवा रुग्ण आढळला आहे. दरम्यान ग्रामीण भागातील या 16 नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 106 वर पोहचला असून त्यापैकी 51 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 52 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 253 वर पोहोचला असून त्यापैकी 114 रुग्ण बरे झाले आहेत. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 129 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.