Coronavirus | कोरोना आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन; विधीमंडळाच्या परिसरात एकच चर्चा...
रश्मी पुराणिक, एबीपी माझा | 11 Mar 2020 05:10 PM (IST)
जगभरात सध्या कोरोना व्हायरसचीच चर्चा सुरुय. राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्याला अपवाद राहिले नाही. आज विधीमंडळाच्या आवारात देखील कोरोना व्हायरस विषयीच चर्चा सुरू होती.
मुंबई : सध्या जगभर एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे कोरोना व्हायरस. याला राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनही अपवाद ठरले नाही. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर चार दिवस विधी मंडळाचे कामकाज नव्हते. होळी आणि धुळवडीची सुट्टी होती. मंगळवारी पुण्यात कोरोना बाधित पाच रुग्ण ही बातमी आली आणि बुधवारी विधी मंडळात सकाळपासून एकच चर्चा, कोरोनामुळे काय होणार? सकाळीच विधी मंडळात प्रवेशाच्या वेळी सुरक्षा अधिकारी विचारत होते, अधिवेशन गुंडाळणार का? कोरोना रुग्ण आढळले. तिथून पुढे विधी मंडळाच्या परिसरातील अधिकारी, कर्मचारी ह्यांची कोरोनवरच चर्चा सुरू होती. अगदी दोनजण भेटल्यावर कोणी हँडशेक केलं तर अरे नमस्कार करा, आता हँडशेक नको असं एकमेकांना सांगून विनोद करणं सुरू होतं. अगदी गृहमंत्री अनिल देशमुख ही इतर मंत्र्यांना भेटल्यावर नमस्कार करत आता नमस्ते केलं पाहिजे सांगत होते. Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं! अरे गर्दी करू नका, किमान कोरोनाचा विचार करा राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पण विधी मंडळात आले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, आमदार असे अनेकजण होते. शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात थोड्या वेळ बसले आणि नंतर निघणार होते. ते येणार म्हटल्यावर सुरक्षा रक्षक बाहेर आले. पण त्या रस्त्यात पत्रकार, आमदार, राष्ट्रवादी पदाधिकारी गर्दी करून उभे होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तिथेच होते. त्यांनी मग सगळ्यांना "अरे गर्दी करू नका, किमान कोरोनाचा विचार करा" असं म्हटल. त्यामुळे त्या पॅसेजमध्ये सगळेच हसायला लागले. coronavirus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल चॉकलेट ऐवजी सॅनिटायझर आज विधी मंडळात अनेक मंत्री, आमदार, त्यांचे स्वीय सहाययक हे चक्क सॅनिटायझर घेऊन फिरत होते. विधी मंडळात कोणी चॉकलेट देत होते, तर कोणी वेलची, पण आज लोक एकमेकांना सॅनिटायझर देत असल्याचे चित्र होते. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी तर विधी मंडळाच्या पायऱ्यांवर पत्रकारांच्या हातावर. "तुम्ही सगळ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे, तुम्ही पण हात मिळवताना काळजी घेतली पाहिजे" असं म्हणत सॅनिटायझर वाटप केलं. Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा विधिमंडळात एकदिवसीय पास देण्याचा निर्णय विधी मंडळात सध्या मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या कामासाठी येतात. शाळेतील मुलं, विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक विधानभवनात कामकाज पाहायला येतात. विधिमंडळात खूप गर्दी असते त्याबाबत आमदारांनी पण प्रश्न उपस्थित केले होते. ही गर्दी टाळावी म्हणून एकदिवसीय पास न देण्याचा निर्णय पण झाला आहे. बाहेरून एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती विधी मंडळात आली तर इथं अनेक आमदार, मंत्री अनेकजण येतात. इथं मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो, अशीच चर्चा सगळ्यांमध्ये रंगली होती. या सगळ्यात कोणीतरी मास्क घालून फिरताना पण दिसत होतं. एकूणच कोरोनाचे सावट आज दिवसभर विधी मंडळावर होते. Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, प्रत्येक जिल्ह्यात यंत्रणा सतर्क : राजेश टोपे