मुंबई : कोरोनाने जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांना ठप्प व्हायला भाग पाडलं. एरव्ही रस्त्यांवर मुंगीलाही वाट काढायला जागा न देणारी वाहनं रस्त्यावरुन अचानक गायब झाली. धूर ओकणाऱ्या कारखान्यातलं काम थांबलं. बांधकामं थांबली इतकंच काय तर नाक्यावरच्या टपरीपाशी निघणारी सिगरेटच्या धुराची वलयंही नाहीशी झाली आणि कित्येक वर्षांनंतर या शहरांतल्या रस्त्यांनी आणि हवेनेही मोकळा श्वास घेतला.


कोरोनामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं जगभरातली शहरं लॉकडाऊन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जगभरातल्या बंद असलेल्या शहरांमधली प्रदूषणाची पातळी कमालीची घटली आहे.


चीन - चीनमधलं आकाश निरभ्र झालं. वुहान ज्या ठिकाणी आहे त्या हुबेई प्रांतात फेब्रुवारी महिन्यात हवेच्या गुणवत्तेत 21.5 टक्के वाढ झाली. इतकंच काय नासाने घेतलेल्या सॅटेलाइट फोटोवरुनही कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर वातावरणात झालेला फरक दिसून येतो.


इटली - इटलीत व्हेनिसमधील कालव्यातील पाणी स्वच्छ झालं. त्याठिकाणी, जवळपास एका महिन्याला 50 लाख पर्यटक भेट देतात. आता पर्यटकांची संख्या कमी झाल्याने व्हेनिसच्या कालव्यात नाव, बोट यामुळे होणारं प्रदूषण कमी झालं आहे. आता तिथे डॉल्फिन उड्या मारताना दिसतात. तसंच पाणीही स्वच्छ झालं आहे.


इतर देशांमधल्या प्रदूषणाच्या पातळीत जी घट झाली आहे तीच स्थिती थोड्या बहुत फरकाने आपल्याकडेही आहे.

- सामान्यत: मार्च महिन्यात प्रदूषणाची पातळी मध्यम श्रेणीत असते. पण ती चक्क सध्या उत्तम श्रेणीत आहे.


- मुंबई, पुणे या ठिकाणी हवेची गुणवत्ता - एअर क्वॉलिटी इंडेक्स 50 ते 100 किंवा 100 ते 150 असतो, तो आता एक्यूआय 0-50 श्रेणीत आहे.


- 2018 आणि 2019 च्या तुलनेत मार्च 2020 मध्ये मुंबई आणि पुण्यातील नायट्रोजन ऑक्साईडच्या पातळीत 45% घट झाली आहे.


- पी.एम 2.5 या प्रदूषक घटकाची पातळी दिल्लीत 30 टक्क्यांनी खालावली आहे.


- एनओएक्स (नायट्रोजन ऑक्साईड) प्रदूषण घटकाची पातळी पुण्यात 43 टक्के, मुंबईत 38 टक्के, आणि अहमदाबादमध्ये 5 टक्क्यांनी घटली आहे.


- गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईतले सर्वाधिक प्रदुषित भाग असणारे सायन आणि कुर्ला इथे हवेची गुणवत्ता चक्क उत्तम आहे.


सिस्टम ऑफ एयर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांनंतर हवेची ही गुणवत्ता पाहायला मिळत आहे.


मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवरही एरव्ही माणसांची गर्दी आणि भरतीच्या लाटांसोबत येणारा कचरा दिसतो पण आता तिथेही निळंशार पाणी आणि त्यावर अंथरलेलं निळं आभाळ दिसतंय.


कोरोनाने माणसांना पिंजऱ्यात टाकलं आणि आजपर्यंत माणसाने ज्या हवेला धूरकट बनवलं तिनेही मोकळा श्वास घेतला. या रस्त्यांवर, समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छ मोकळी प्रदूषणविरहीत हवा आहे. कोरोनाचं संकट संपेल तोपर्यंत कदाचित ही मोकळी, प्रदूषणविरहीत हवाही पुन्हा एकदा अनोळखी होईल.