मुंबई : मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात एकाच दिवसात कोरोना संसर्गाची 81 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकारे आर्थर रोड जेलमधील कोरोनाबाधितांची संख्या 158 वर पोहोचली आहे. या 158 कैद्यांव्यतिरिक्त 26 जेल कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं की, आर्थर रोड कारागृहातील 77 कैदी आणि 2 कारागृहामधील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आर्थर रोडमधील कैद्यांना मुंबईच्या माहुल गावात असलेल्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये नेण्यात येणार होते. परंतु आता तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तुरुंगातील कैद्यांना जेलमध्येच तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले आहे. याठिकाणी जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर दररोज तुरुंगात जाऊन तपासणी करणार आहेत.
जेलच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्थेमुळे आणि मेडिकल कारणांसाठी कैद्यांना माहुल गावात न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांना आर्थर रोड कारागृहाचे सर्कल क्रमांक 3 आणि सर्कल क्रमांक 10 मध्ये क्वॉरंटाईन सेंटर करण्यात आलं आहे. आज जे.जे. रुग्णालयाचे 7 डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी तुरूंगात आले आणि त्यांनी कैद्यांची तपासणी केली.
राज्यात सलग पाचव्या दिवशी हजारच्या पटीत कोरोना बाधित रुग्णांची वाढ
या कैद्यांना कोरोनाची बाधा होण्यापासून बचाव करणे गरजेचं आहे आणि त्याचवेळी पोलीस पहारा ठेवणे देखील आवश्यक आहे. अंडर ट्रायल कैद्यांवर गंभीर गुन्हे आहेत. यामध्ये खून, लैंगिक शोषणाचे आरोपी आहेत. मुंबईतील आर्थर रोड जेल शहरातील सर्वात मोठी आणि हायप्रोफाइल जेल आहे. या जेलची क्षमता सुमारे 800 आहे. पण तुरुंगात सध्या 2800 हून अधिक कैदी आहेत. कोरोना संकटाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने तुरुंगातून 1100 कैद्यांची जामिनावर मुक्त केले होते.
राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती
राज्यात आज दिवसभरात नवीन 1278 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील एकूण रुग्णसंख्या 22 हजार 171 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज सगळ्यात जास्त 53 रुग्णांचा मृत्यू झालाय. एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद आज झाली आहे. दिलासादायक म्हणजे आज 399 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 4199 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
Lockdown Special Trains | 12 मे पासून प्रायोगिक तत्त्वावर 15 ट्रेन सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार