मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार की नाही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र काँग्रेसने एकच जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे.


महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीने सहा जागा लढवाव्या ही काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र निवडणूक घेणे सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत अवघड आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केली की निवडणूक बिनविरोध करुयात. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन महाविकास आघाडी पाच जागा लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.


महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक 


कोरोनाचं संकट नसतं तर निवडणूक घेणे शक्य होतं. मात्र सध्या सर्व आमदारांना मुंबईत आणणं आणि निवडणूक घेणं कठीण आहे. संख्याबळ पाहता काँग्रेसला कमी बाजू आली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची विनंती आणि कोरोनाचं संकट पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.


कसं आहे आकड्यांचं गणित?


या निवडणुकीत विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर 1 उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 या तीन पक्षांचे मिळून 154 संख्याबळ आहे. तर याशिवाय बच्चू कडूंचा प्रहार 2, स्वाभिमानी 1, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 असं 17 जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच 154 + 17 असं 171 मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे.