Corona Infection in Byculla Jail : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील भायखळा तुरुंगातील 39 जणांना कोरोनाती बाधा झाली आहे. भायखळातील महिलांसाठी असलेल्या तुरुंगात गेल्या 10 दिवसांत सहा मुलांसह 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 


भायखळा महिला कारागृहात गेल्या दहा दिवसांपासून 39 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सहा लहान मुलांचाही समावेश आहे. यापैकी 36 जणांना जवळच असणाऱ्या एका शाळेत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर वरिष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व कैद्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


कारागृहात एकाचवेळी 39 कैदी कोरोनाबाधित आढळल्यानं खळबळ माजली आहे. कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, गेल्याच आठवड्यात तुरुगांत कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीनं लागण झालेल्या कैद्यांसह संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांनासुद्धा उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, तुरुंगाच्या आतमध्ये वेळोवेळी कोरोनाच्या तपासणी अभियान राबवलं जात आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


देशात तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अशातच तिसरी लाट राज्याच्या उंबरठ्यावर आहे, असा इशारा वारंवार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. अशातच मुंबईत गेल्या 24 तासांत 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासांत पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4676 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1195 दिवसांवर गेला आहे.