मुंबई : मुंबई शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस आजपासून कोणताही दंड आकारणार नाहीत. मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने 19 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती. त्यानंतर महापालिकेने दंड आकारण्याचे अधिकार पोलिसांना दिले होते. आजपासून मुंबई महापालिकेने हे अधिकार पोलिसांकडून परत घेतले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडील फाईन बुक आणि आतापर्यंत आकारलेली दंडाची रक्कम जमा करण्याची विनंती महापालिकेने केली आहे.


मुंबई महापालिकेने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. या पत्रकानुसार, "मनपा आयुक्तांनी 19 फेब्रुवारी 2021 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर 200 रुपये दंड आकारण्याची कार्यवाही करण्याचे अधिकार मुंबई पोलिसांना प्रदान करण्यात आले आहे. हे अधिकार 1 एप्रिल 2022 रोजी संपुष्टात येत आहे याची नोंद घ्यावी आणि 1 एप्रिल 2022 पासून सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर मुंबई पोलिसांकडून करण्यात येणारी दंडात्मक कारवाई विनाविलंब थांबवावी. याशिवाय मनपाकडून दिलेली दंडाची पावती पुस्तके परत करावी आणि दंडात्मक काईवाई केलेल्या रकमेचा भरणा मनपाकडे करावा ही विनंती."




महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध आजपासून हटवले
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (31 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 1 एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. 
जवळपास दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधात बांधलेला महाराष्ट्र आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निर्बंधमुक्त होत आहे.


राज्यात मास्कचा वापर आता ऐच्छिक
आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधापासून मुक्तता मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ज्यांना मास्क वापरायचा आहे त्यांनी वापरावा, तुमच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करा असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 


क्लीन अप मार्शलच्या 'मास्क वसुली'पासून नागरिकांना मुक्ती
राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर आता आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात आला आहे. याआधी मास्कचा वापर न केल्यास त्यावर दंड आकारला जात होता तो आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे क्लीन अप मार्शल आणि पोलिसांच्या दंड वसुलीपासून सामान्यांची सुटका झाली आहे. 


संबंधित बातम्या


Covid-19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही


Mask : क्लीन अप मार्शलच्या 'मास्क वसुली'पासून नागरिकांना मुक्ती; राज्यात मास्कचा वापर आता ऐच्छिक