मुंबई : मुंबई-गोवादरम्यान सुरु करण्यात आलेल्या नव्या आंग्रिया क्रूझवर काढलेल्या सेल्फीमुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या चर्चेत आहेत. क्रूझवरील धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढून नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. अमृता फडणवीस यांनी गाणं आणि नृत्य शिकलं तसा शासकीय प्रोटोकॉलही शिकावा असा टोला काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला आहे.
शासकीय कार्यक्रमात काही प्रोटोकॉल असतात. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृत फडणवीस यांनी शासकीय प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. अमृता फडणवीस यांनी जेवढ्या लवकर गाणं आणि नृत्य शिकलं, तेवढ्याच लवकर शासकीय सुरक्षेचा प्रोटोकॉलही शिकावा असा टोला लगावला.
अमृता फडणवीस क्रूझवरील धोकादायक ठिकाणी पुढे जात होत्या. त्यावेळी सुरक्षा अधिकारी त्यांना थांबवत होते. मात्र त्या अधिकाऱ्यांना सल्ला न मानत क्रूझच्या टोकाला जाऊन बसल्या. शुद्ध हवेबाबत काही आक्षेप नाही, मात्र वर्षा बंगल्याबाहेरील समुद्र किनारी हवाच हवा आहे, असं संजय निरुपम म्हणाले.
अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण
आंग्रिया क्रूझच्या काठावर सेल्फी काढण्यासाठी नाही, तर शुद्ध हवा घेण्यासाठी बसले होते, असं स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. मात्र तरीही लोकांना त्यात काही चुकीचं वाटत असेल तर दिलगिरी व्यक्त करते. परंतु लोकांनी धोकादायक सेल्फी काढू नयेत, कुणाचंही अनुकरण करु नये, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
मुंबई-गोवादरम्यान आंग्रिया ही नव्यानं क्रूझ सेवा सुरु झाली आहे. या क्रूझच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसह उपस्थित होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रूझच्या मनाई असलेल्या टोकावर जाऊन त्याठिकाणी बसून सेल्फी काढले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात अमृता फडणवीस ट्रोल झाल्या होत्या.