मुंबई : कोरोनाच्या आपत्ती काळात अनेक मंत्री आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री असल्याने थांबून काम करत होते. विदर्भातील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यातील निर्णय हे त्यांना विश्वासात न घेता मुंबईत झाले. इतकंच नाही तर निर्णय होऊन फक्त फाईली मंत्र्यांच्या सहीसाठी गेल्या. त्यामुळे काँग्रेसचे मंत्री नाराज झाले. चौदा तास प्रवास करुन मुंबईत आले. आपल्या खात्यातील निर्णय परस्पर होत आहेत याची तक्रार मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटून करणार होते पण तेव्हा मुख्यमंत्री भेटले नाही. हा विषय मग वाढत गेला.


राहुल गांधी यांच्यासाठी महत्त्वाची असलेली न्याय योजना छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारने लागू केली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना आहे. ही न्याय योजना राज्यातही लागू करावी अशी मागणी कॅबिनेटमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पण हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये प्रलंबित असून त्यावर कोणतीही चर्चा न झाल्याने काँग्रेसचे मंत्री अजून नाराज झाले.


विविध विभागातील विकासकामांचा निधी हा देखील कळीचा मुद्दा झाला. महाविकास आघाडीत तीन पक्ष असून या विकास निधीचे समसमान वाटप झालेलं नाही. ही बाब काँग्रेसला आढळून आल्यानंतर त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली. काही खात्यात त्यांना ही माहिती देखील देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यानंतर काँग्रेस मंत्र्यांची तात्काळ मुंबईत गेल्या आठवड्यात बैठक झाली आणि या बैठकीत आतापर्यंत झालेल्या घटना, निर्णयप्रक्रियेत न मिळालेले स्थान आणि विकास निधी वाटप याबाबत मुख्यमंत्र्यांना थेट भेटून संगण्याबाबत निर्णय झाला.


हे सगळं सुरु असताना अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन होऊन पायाभूत सुविधा अशा नवीन खात्याची निर्मिती होणार आहे. त्या नवीन खात्यात अशोक चव्हाण यांच्या विभागातील अनेक उपविभाग हस्तांतरित होणार आहेत. याची प्रक्रिया सुरु झाली आणि याबद्दल अशोक चव्हाण यांना काहीच माहिती नव्हती. कोणी त्यांच्याशी चर्चा देखील केली नाही, त्यामुळे अशोक चव्हाण दुखावले गेले.


हे सगळे विषय एका मागून एक प्रलंबित राहिले. ह्यातूनच विसंवादाची दरी काँग्रेस आणि शिवसेनेत वाढत गेली आहे. त्यात आज मुख्यमंत्री आणि काँग्रेस मंत्र्यांच्या भेटीआधी 'सामना' अग्रलेखातून काँग्रेसला सुनावण्यात आले. त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ 'सामना'चा अग्रलेख अर्धवट माहितीवर आधारित असल्याचं सांगून शिवसेनेला टोला लगावला.


महाविकास आघाडीचे तीन चाकी सरकार पहिले सहा महिने नीट चालले तरी आता मात्र त्यातील कुरबुरी समोर यायला लागल्या आहेत. तिन्ही पक्षातील नेते सगळ नीट आहे काहीही वाद नाहीत हे सांगत असले तरी समोर येणारे चित्र मात्र वेगळंच दिसत आहे.


खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक दिल्लीत बसले आहेत : संजय राऊत