मुंबई : "आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट आणि 'सामना'तील अग्रलेखावर भाष्य केलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, "कोणत्या बदल्यांसाठी आम्ही आग्रही नाहीत. तर महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत ही अपेक्षा आमची आहे. त्यासाठी आम्ही बैठक मागत आहोत. खाटेचं कुरकुरणं आधी ऐकून तर घ्यावं. ते ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. आज-उद्या मुख्यमंत्री भेटतील. आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही म्हणणं मांडल्यानंतर 'सामना'ने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे चुकीचा संदेश आमच्याबद्दल जातोय आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहोत, आघाडीबरोबर राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला चर्चा करायची आहे आणि राज्याचे प्रमुख, आघाडीचे प्रमुख या नात्याने त्यांनी ऐकून घ्यायला हवं. मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकल्यानंतर ते समाधानी होतील."
56, 54, 44 नुसार मंत्रिमंडळाचं वाटप
"56, 54 आणि 44 प्रमाणे आम्ही मंत्रिमंडळाचं वाटप केलेलं आहे. त्यानुसारच आम्हाला मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे. हा काही वादाचा विषय नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय आम्हाला अपेक्षित आहेत. त्यासाठी आम्हाला भेट घ्यायचे आहेत," असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
अपूर्ण माहितीवर 'सामना'चा अग्रलेख
'सामना'च्या अग्रलेखाविषयी बाळासाहेब थोरात म्हणाले की, "अपूर्ण माहितीवर हा अग्रलेख लिहिला आहे. त्यामुळे तसं होऊ शकेल. आमची भेट झाल्यावर त्यांनाही वस्तुस्थिती समजेल. पुन्हा एक चांगला अग्रलेख येईल. 'सामना' शिवसेनेचं मुखपत्र आहे. त्यामुळे अपेक्षित एवढंच आहे की व्यवस्थित माहिती घेऊन त्यात लिखाण असावं."
'सामना'च्या अग्रलेखातून काँग्रेसला चिमटे
"सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरेंच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहिल हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. शरद पवारांनी हे पथ्य पाळलंय. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे.
काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाल लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, इतकेच शेवटी सांगायचे."