मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज (16 जून) वृद्धापकाळाने निधन झालं. मुंबईतील दादर इथल्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या 95व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. निस्वार्थ पत्रकारिकेचा आदर्श अशी त्यांची ओळख होती. पत्रकारिता क्षेत्रात दिनू रणदिवे यांचं महत्त्वाचं योगदान होतं. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
दिनू रणदिवे यांचा अल्पपरिचय
- दिनू रणदिवे यांचा जन्म 1925 मध्ये डहाणूतील आदिवासीबहुल भागात झाला.
- त्यांनी 1956 साली पत्रकारितेला सुरुवात केली.
- समाजवादी पक्षाने 1955 मध्ये छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय होते.
- त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. या लढ्यात त्यांनी कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत कारावासही भोगला.
- संयुक्त महाराष्ट्र समितीने 1956 साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरु केले. - रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात इथूनच झाली.
- यानंतर दिन रणदिवे 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये रुजू झाले आणि महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं.
- 1972 मध्ये दिनू रणदिवे यांनी केलेलं बांग्लादेश मुक्तीलढ्याचं वार्तांकनही गाजलं होतं.
- 15 सप्टेंबर 1985 रोजी ते 'मटा'तून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले.
- त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका आणि लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे.
- त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच वृत्तसंस्था एएफपीसाठीही काम केलं होतं. 2002 मधील गुजरात दंगलीचे वास्तवसुद्धा त्यांनी माध्यमांमध्ये आणले होते.
- पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला आहे.
Senior Journalist Dinu Randive | ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं वृद्धापकाळानं निधन