मुंबई: मी काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं माझ्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे, पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते असा टोला काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी लगावला. NSUI चे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेल्या कन्हैय्या कुमार यांनी देशात वारेमाप वाढलेली बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी गोष्टींवर सडकून टीका केली.
मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल
महाराष्ट्राची भूमी ही संत महात्म्यांची भूमी आहे. ज्या वेळी देशभरात इंग्रजांविरुद्ध ब्र काढण्याचीही कोणाचं धाडस नव्हतं त्यावेळी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' ही गर्जना महाराष्ट्रातूनच देशभरात दुमदुमली होती. वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीरांची ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहीत धरण्याचं काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे. पण मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच धास्तीपोटी हे सरकार निवडणुका घेत नसल्याचं खणखणीत मत NSUI चे प्रभारी कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केलं. मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मुंबईचा वाटा खूप मोलाचा आहे. पण आज हीच मुंबई पंतप्रधानांच्या मित्राला आंदण देण्याची तयारी केंद्र आणि राज्यातल्या सरकारने चालवली आहे, अशी टीका युवा नेते कन्हैय्या कुमार यांनी केली.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच कन्हैय्या यांनी मुंबईने आपल्याला किती भरभरून दिलं आहे, याची आठवण सांगितली. आपल्या मुंबई दौऱ्यात विविध कार्यक्रमांना पोलिसांकडून आडकाठी केली जात आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. ठराविक नेत्यांचे तळवे चाटणं, म्हणजे देशसेवा अशी धारणा आजकाल झाली आहे. पण या नेत्यांचे पगार, भत्ते लोकांनी भरलेल्या करातून निघतात. त्यामुळे हे लोक सामान्य जनतेला उत्तरदायी आहेत, हे त्यांना विसरून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा शालजोडीतला टोलाही त्यांनी हाणला.
कन्हैय्या कुमार यांचं स्वागत करताना मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडून संपूर्ण दौऱ्यातील विविध कार्यक्रमांना कशी आडकाठी केली जात आहे, हे नमूद केलं. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे सर्व जनता ओळखते. पण हा दबाव झुगारून आम्ही आमचे कार्यक्रम करणार आहोत, असंही त्या म्हणाल्या.
सबका साथ सबका विकास, मग पात्रता निकष कशाला?
एकीकडे पंतप्रधान ‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत पुनर्विकासाधीन असलेल्या लोकांना पात्रता निकष लावतात. समजा सगळे आपलेच असतील, तर मग हा पात्रता निकष कशासाठी, असा प्रश्न कन्हैय्या यांनी विचारला. धारावी पुनर्विकास प्रकल्पात हजारो लोकांना पात्रता निकष लावून बाद ठरवण्यात येत आहे
देशात दर तासाला एका विद्यार्थ्याची आत्महत्या
पंतप्रधान मोदींनी आज विद्यार्थ्यांसाठी खास अॅपची घोषणा केली. वास्तविक या असल्या चमकदार घोषणा करण्याऐवजी पंतप्रधानांनी त्यांनीच दिलेलं दर वर्षी दोन कोटी रोजगारांचं वचन प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या एकूण अर्थसंकल्पापैकी १० टक्के रक्कमही शिक्षणावर खर्च होत नाही. सरकारला शिक्षणाचं खासगीकरण करायचं आहे. हे सर्वसामान्यांना परवडणार नाही. मुलांच्या शाळेची फी, गणवेश, वह्यापुस्तकं आणि इतर गोष्टींमध्येच पालकांचा प्रचंड खर्च होतो. हे सगळं एका बाजूला असताना दुसरीकडे देशात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. देशात दर तासाला एक विद्यार्थी आज आत्महत्या करत आहे. पण त्याबाबत कोणालाच काहीच पडलेलं नाही, अशी टीकाही कन्हैय्या यांनी केली.
फडणवीस यांचा ‘अडवाणी’ केला
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कन्हैय्या कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला. आजकाल त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात, असं सांगत आपल्याला फडणवीस यांची दया येते, असंही कन्हैय्या म्हणाले. फडणवीस 'मी पुन्हा येईन' असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. 105 आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत असल्याची टीका त्यांनी केली. तसंच भाजपच्या या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की, पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपमध्ये गेल्यानंतर अचानक पवित्र होतो, असा सवालही त्यांनी या वेळी केला.
आर्थिक धोरण बदलण्याची गरज
देशात रोजगार निर्मिती वाढवायची असेल, तर देशाचं आर्थिक धोरण बदलण्याची गरज कन्हैय्या कुमार यांनी बोलून दाखवली. आज आपण चीनमधून आलेल्या गोष्टी वापरतो. पण आपल्याकडील उत्पादकता आपण मारली आहे. सेवा क्षेत्रासोबतच उत्पादनावर भर दिला, तरच देशात रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी एककेंद्रीतता मोडावी लागेल, असंही कन्हैय्या म्हणाले. आज देशात सगळ्याच क्षेत्रांमध्ये एककेंद्री व्यवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळत नाही. स्पर्धेसाठी समान संधी तयार केली, तरच नवे उद्योजक आणि उद्योग उभे राहतील. त्यातूनच रोजगारनिर्मिती होईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.