भिवंडी: भिवंडीत (Bhiwandi) आगीचे सत्र सुरूच असून, पुन्हा अग्नितांडव (Fire News) पाहायला मिळाले. भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाउंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामासह चप्पलचे गोदाम असे तिन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात दिवसाआड लहान मोठ्या आगीच्या दुर्घटना घडतच आहेत. त्यातच आज दुपारच्या सुमारास राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोवींद कंपाऊंड मधील एका गोदामात ठेवण्यात आलेल्या केमिकलला अचानक आग लागल्याने या आगीमुळे लगतच्या केमिकल गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकलने क्षणातच मोठा पेट घेऊन दोन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. तर केमिकल गोदामालगत असलेल्या एका चप्पलचे गोदामही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
सध्या भिवंडी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून नागरिकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्याचे दिसून येत आहे. तरी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहे.
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
दहा दिवसांपूर्वीच भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावच्या हद्दीत असलेल्या दालमिल कंपाऊंड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. भिवंडीतील एका केमिलक गोदामात आचानक भीषण आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावच्या हद्दीत असलेल्या दालमिल कंपाऊंड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली.केमिकल गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल फॉर्म पावडर तसेच, केमिकलचे ड्रम्स आणि डिंक होते. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेत लाखोंचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर दोन तासानंतर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
सखोल चौकशीची मागणी
दरम्यान, भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगी नेमक्या लागतात कशा याचीही माहिती समोर येणं महत्वाचं आहे. त्यामुळं या आगीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.