मुंबई : लोकप्रिय आईसक्रीम ब्रॅण्ड 'नॅच्युरल्स' आईसक्रीमला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. याच नावाच्या गुजरातमधील कंपनीला पुढील आदेश मिळेपर्यंत 'नॅच्युरल्स' हे नाव वापरण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे.
नॅच्युरल्स आईसक्रीमचे सर्वेसर्वा रघुनंदन कामत यांनी वडोदरा, गुजरात येथील मंजलपूरमधल्या नॅच्युरल्स आईसक्रीम नावाच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडोदऱ्याचे सन्मान पटेल यांनी आपण साल 1992 पासून 'नॅच्युरल्स आईसक्रीम' या नावाचा ट्रेडमार्क वापरत असल्याचा दावा कोर्टात केला. मात्र, रघुनंदन कामत यांनी त्यापूर्वीच म्हणजे 1984 पासून नॅच्युरल्स या नावाचा ट्रेडमार्क नोंदवला होता. त्यासंदर्भातील सर्व कगदोपत्री पुरावे कामत यांनी न्यायालयात सादर केले. त्यामुळे प्रथमदर्शनी सन्मान पटेल यांना नॅच्युरल्स हा ट्रेडमार्क वापरण्याची मनाई करण्याचा कामत यांचा दावा योग्य असल्याचं नमूद करत हायकोर्टानं कामत यांना अंतरिम दिलासा दिला. तसेच पटेल यांना पुढील आदेश येईपर्यंत 'नॅच्युरल्स' हे नाव व्यापारासाठी आणि कोणतंही उत्पादन विक्रीसाठी वापरण्यास मनाई करत सुनावणी 9 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
या कंपनीनं ‘नॅच्युरल्स’ या नावाचा वापर करून ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा करत त्यासाठी 150 कोटींची नुकसान भरपाईही कामत यांनी या याचिकेद्वारे मागितली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. तेव्हा, नॅच्युरल्स आईसक्रीम हा आईसक्रीम जगतातला एक लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. रघुनंदन कामत यांनी साल 1984 मध्ये 'नॅच्युरल्स' या नावाने रितसर ट्रेडमार्कची नोंद करून या आईसक्रीम निर्मिती, विक्री आणि वितरणास सुरुवात केली. आज नॅच्युरल्स आईसक्रीम जवळपास वर्षाला 48 लाख किलो आईसक्रीमची विक्री करत असून त्यांच्या देशभरात 130 फ्रेंन्चाईजी आहेत. त्यांची साल 2019-20 ची वार्षिक उलाढाल 312.7 कोटी एवढी आहे. वडोदरास्थित या आईसक्रीम कंपनीनं कामत यांच्या नॅच्युरल्स आईसक्रीम या ट्रेडमार्क नावाचा वापर करून व्यापार जगत आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण केल्याची माहिती कामत यांच्यावतीनं हायकोर्टात दिली गेली. प्रतिवादी वडोदरास्थित कंपनीचे मालक सन्मान पटेल यांच्यावतीनं मात्र कामत यांच्या या दाव्याला विरोध करण्यात आला.