मुंबई : प्रेमासाठी आणाभाका घेत आणि अनेक मर्यादा ओलांडत काहीतरी करुन दाखवणाऱ्यांची अनेक उदाहरणं आजवर पाहिली गेली आहेत. आता यातच भर प़डली आहे ती म्हणजे ब़ॉलिवूडमधील एका पटकता लेखकाची. ज्यानं आपल्या प्रेयसीच्या आनंदासाठी आणि तिला सहलींना नेण्यासाठी थेट लोकांनाच फसवण्याचा मार्ग अवलंबला.


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्याच आर्थिक गणितांमध्ये गुंतागुंत वाढली. या लेखकालाही याचाच फटका बसला. शुभम पीताम्बर साहू असं या २८ वर्षीय लेखकाचं नाव. बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करत असताना हा लेखक बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर त्याचं नशीब आजमावू पाहत होता.


ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहू हा एका मुलीच्या प्रेमात होता. ही मुलगी एक युट्य़ूबर आहे. आपण सामोरं जात असणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत प्रेयसीला माहिती मिळू नये यासाठीच मग त्यानं असंकाही केलं, ज्यामुळं त्याला थेट पोलिसांकडूनच शिक्षा मिळाली.


पैशांअभावी आर्थिक चणचण जाणवू लागली खरी. पण, प्रेयसीला याबाबत काहीच कळू न देण्यासाठी साहूनं लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. याच फसवणुकीतून आलेल्या पैशांतून त्यानं प्रेयसीला सोन्याची बांगडी भेट दिली. इतक्यावरच न थांबता त्यानं प्रेयसीला जयपूरला सहलीसाठी नेण्याचीही व्यवस्था केली.


लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यानं एक नवा मार्ग अवलंबला. मुंबईतील लोखंडवाला भागातील एका टूर्स एँड ट्रॅव्हल कंपनीशी संपर्क करुन त्य़ानं ऑनलाईन फ्लाईट आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक केला. या साऱ्याचं बिल 32 हजार रुपये इतकं झालं.


बुकिंग झाल्यानंतर साहूनं त्या कंपनीकडे त्यांच्या बँक खात्याचा तपशील मागितला. यावर पैसे पाठवण्याऐवजी त्यानं बल्क मेसेजिंग वेबसाईटवर जात गदी तसाच मेसेज पाठवला जसा तुमच्या खात्यात पैसे आल्यावर येतो. इतकंच नव्हे तर, साहूनं याच मार्गाचा वापर करत एका सोनाराकडून 1 लाख 33 हजार रुपये किंमचीच्या सोन्याच्या बांगड्यांची खरेदी केली.


पाहा व्हिडीओ : प्रेमासाठी वाट्टेल ते...प्रेयसीला खूश करण्यासाठी लोकांना फसवणारा बॉलिवूडचा लेखक अटकेत



दरम्यान, दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रॅव्हल एजंटनं बँकेत जाऊन पासबुकची एंट्री केली तेव्हा मात्र खात्यात 32 हजारांची रक्कम आली नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. ज्यानंतर त्यानं रितसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या बळावर साहूविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 420,467,465 आणि आयटी कायद्याच्या कलम 66 C, 66 D अन्वये गुन्हा नोंदवत शुभमला अटक करण्यात आली.


अटक करण्यात आल्यानंतर पोलीस चौकशीदरम्यान आपण आर्थिक अडचणीमुळं या मार्गाचा अवलंब केल्याची कबुली त्यानं दिली. सदर प्रकरणी सोनारानंही तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवताच शुभमच्या प्रेयसीनं बांगड्या परत केल्या. प्रियकरानं फसवणूक केल्याची माहिती आपल्याला नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं.