बार्शी : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्हआला आहे. व्हॉट्सअपच्या स्टेटसद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. "लक्षणे दिसत असल्याने मी कोव्हिड टेस्ट करून घेतली होती, ती पॉझिटिव्ह आली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी" असे आवाहन त्यांनी याद्वारे केले आहे.
3 डिसेंबरला रणजितसिंह डिसले यांना जागतिक पातळीवरील युनेस्को आणि वार्कि फाउंडेशन तर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड जाहीर झाला. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी अनेकांनी त्यांची भेट घेतली. दररोज शेकडोजण त्यांच्या घरी भेट घेण्यासाठी येत होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी बार्शीतील रणजित डिसले यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला.
तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, वर्षा गायकवाड यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील रणजीत डिसले गुरूजींचा मुंबईत सन्मान केला. सोमवारपासून रणजीत डिसले हे मुंबईत होते. मुंबईतून परतल्यानंतर त्यांना काहीसा ताप जाणवू लागला. खबरदारी म्हणून रॅपिड एंटीजन टेस्ट केली असता त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती कळत आहे.
जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुन अधिक शिक्षकांमधून निवड
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Special Report | सोलापूरच्या डिसले गुरुजींचा जगभरात डंका; सात कोटींच्या पुरस्कारामागची कहाणी