मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापलेल्या पुस्ताकाची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सात दिवसात आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.


या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या पत्नीची भाषा शिवराळ आहे, असंही लिहलं गेलं असल्याचं दिसत आहे. सदानंद मोरे यांना आम्ही संभाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पुस्तकांची पाहणी करण्यासाठी सांगितलं आहे. सात दिवसात याचा अहवाल सादर होईल अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.


तसेच अहवाल सादर होईपर्यंत पुस्तकाचं वितरण स्थगित करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.


विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांनाही विनोद तावडेंनी उत्तर दिलं. शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी अभ्यासक्रमात काय होते आणि त्यात नंतर बदल करण्यात आले, याचा अभ्यास धनंजय मुंडे यांनी करावा, असा टोला तावडेंनी लगावला.



विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा : मुंडे


राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी. तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.


तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली होती.

काय आहे प्रकरण?


सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या 18 व्या पानावर संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख आहे. 'रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले', असा उल्लेख या पुस्तकात आहे.