मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच जातील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. अयोध्या राम मंदिराबाबत शिवसेनेचं भावनिक, धार्मिक आणि राष्ट्रीय नातं आहे. राम मंदिराच्या निर्माणामध्ये शिवसेनेचं कार्य मोठं असल्याने उद्धव ठाकरे भूमिपूजनाला जाणार आहेत, असं राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक 300 जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरु आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचंही नाव असल्याचं कळतं.


आज जे अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं कार्य होतंय त्यातील जे काही अडथळे होते त्यात शिवसेनेने मोठं बलिदान दिलं आहे, रक्त सांडलं आहे. त्याठिकाणी वारंवार शिवसेनेकडून कोणी ना कोणी जात राहिलं आहे. उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री नसताना अयोध्येला गेले होते. शिवाय, महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावरही गेले होते. त्यामुळे अयोध्या राम मंदिर निर्माण भूमिपूजन सोहळा हा देशाच्या दृष्टीने आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने जे हुतात्मे झाले त्यांच्यासाठी एक महत्वचा आणि तितकाच ऐतिहासिक असल्याचं संजय राऊत म्हणाले.


धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळे टाळायला हवे, मुख्यमंत्र्यांना उद्देशून माजीद मेमन यांचं ट्वीट


उद्धव ठाकरे यांना याबाबत निमंत्रण आलं का? याबाबत राऊत यांना विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांना निमंत्रण येईल." शिवाय, हा कार्यक्रम कसा होईल हे जरी माहित नसलं तरी या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान येणार असून ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यासोबतच, कोरोनाची सद्यस्थिती पाहता या कार्यक्रमाला गर्दी होणार नसून काही प्रमुख निमंत्रित या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती असल्याचं संजय राऊत म्हणाले.


शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी आता 'सामना'साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या महत्वाच्या मुद्यावर दिलखुलास चर्चा केली, असं विचारलं असता राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्रीच नाही तर देशाचे राजकीय नेते आहेत. देशात ज्याप्रकारे राजकारण घडताना दिसतंय किंवा काही लोक घडवू पाहत आहेत, ज्याप्रकारे राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये पाहिलं तर नक्कीच अनेक राजकीय विषयावर त्यांनी आपली मतं मांडली आहेत."


संबंधित बातम्या


काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला


अयोध्येचा रस्ता शिवसेनेने बनवला, अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही : संजय राऊत